मुंबई - संपलेल्या पक्षावर बोलत नाही असं म्हणणारे आदित्य ठाकरे अचानक मनसेवर का बोलायला लागले? याचा अर्थ कुठेतरी पायाखालची वाळू सरकली आहे. युवराजांची घाबरगुंडी उडाली आहे. त्यामुळे मनसेबद्दल बोलावं लागतं. केम छो वरलीचे बोर्ड तुम्ही लावणार, जिलेबी ना फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलणार, तेलुगु बांधवांना आमिष दाखवणार आणि बाहेरच्या भूमिपुत्रांसाठी आम्ही लढतोय बोलणार असा टोला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे. आदित्य ठाकरे यांनी मनसेवर गुजरातच्या भूमिपुत्रासाठी काम करते असा आरोप केला होता त्यावर मनसेने पलटवार केला आहे.
संदीप देशपांडे म्हणाले की, आज आमच्यासोबत तेलुगु बांधव आहेत, का आहेत, कारण त्यांना माहित्येय इथं खोटं बोलणारे कुणी नाही, जे खरे आहे ते सांगू. हे आमचे मराठी आहेत. यांना अस्खलित मराठी येते. हे सगळे महाराष्ट्रावर प्रेम करणारे आहेत. यांची मते घ्यायला आम्हाला कुठल्याही बाहेरच्या माणसाला आणण्याची गरज नाही. बाहेरच्या माणसाला तुम्ही आणलं. आम्ही इथेच प्रचार करतोय मग भुमिपूत्र कोण हे आदित्य ठाकरेंनी सांगावे असं सांगत रेवंता रेड्डी यांच्या प्रचाररॅलीवरून आदित्य यांच्यावर निशाणा साधला.
तसेच इथले विद्यमान सुनील शिंदे होते, त्यांची वाजवून तुम्ही उभे राहिलात हे दुसऱ्यांवर टीका कशी करू शकतात. संदीप देशपांडे यांना मनसे पदाधिकाऱ्यांनी बोलावून घेतले, कुणी लादलं नाही. आदित्य ठाकरेंनी स्वत:ला वरळीवर लादलं. सुनील शिंदे, सचिन अहिर यांना विधान परिषद देऊन स्वत:ला वरळीवर लादले. २ राजपुत्र विरोधात सामान्य कार्यकर्ता अशी ही लढाई आहे. वरळीची जनता सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी उभी आहे. आदित्य ठाकरेंचे वडील उद्धव ठाकरे खूप मोठे नेते आहेत. मिलिंद देवरा यांचे वडील मुरली देवरा खूप मोठे नेते होते. उद्धव ठाकरेंमुळे आदित्यला आणि मुरली देवरांमुळे मिलिंद देवरांना ओळखतात. संदीप देशपांडे यांच्या वडिलांचे नाव काय, ते कोण होते. जनता माझ्या पाठीशी म्हणून मला उमेदवारी मिळाली हा त्यांच्यात आणि माझ्यात फरक आहे असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलं.
दरम्यान, मनसेमुळे आदित्य ठाकरे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे हेलिकॉप्टरने फिरणारे आदित्य आजकाल जमिनीवर दिसतायेत. हे मनसेचे यश आहे. लोकांना वरळीत बदल हवाय, लोक यावेळी बदल करतील आणि मनसेचे इंजिन इथे धावेल, राज ठाकरेंना वरळीकर संधी देतील. मराठी, गुजराती, तेलुगु, उत्तर भारतीय बांधव असेल ज्यावेळी त्याला हॉस्पिटलला जायची वेळ येते तेव्हा त्याला आयसीयू लागते. आम्ही सर्वात पहिले पोद्दार हॉस्पिटलमध्ये आयसीयूची व्यवस्था १०० दिवसांत करू असं आश्वासनही संदीप देशपांडे यांनी दिले आहे.