"लढायचे नाही म्हणाले त्यांनाच उमेदवारी"; भांडूपमध्ये करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर मनसे नेत्याचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 02:05 PM2024-10-24T14:05:49+5:302024-10-24T15:43:42+5:30
भांडूपमधील मनसे नेते संदीप जळगावकर यांचा पत्ता कट केल्याने त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.
Bhandup West Assembly Constituency : विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमदेवरांची यादी जाहीर केली. या यादीमध्ये दुसऱ्याच स्थानी राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांचे नाव होते.अमित ठाकरे पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतल्याने दिवसभर याचीच चर्चा सुरु होती. मात्र दुसरीकडे, भांडुपमध्ये मनसेला मोठं खिंडार पडलं आहे. भाडुंपमधून मनसेचे विभागप्रमुख संदीप जळगावकर हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते.
मात्र मनसेने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत त्यांच्या ऐवजी शिरीष सावंत यांना संधी देण्यात आल्याने जळगावकर यांच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. जळगावकरांऐवजी सावंतांना उमेदवारी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. मनसे नेत्यांशी चर्चा करुनही मार्ग न निघाल्याने आता संदीप जळगावकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.
भांडुपमधून मनसेने विभागप्रमुख संदीप जळगावकर यांच्याऐवजी शिरीष सावंत यांना उमेदवारी दिल्याने स्थानिक पदाधिकारी-कार्यकर्त्यांत तीव्र नाराजी पसरली आहे. शिरीष सावंत हे निरीक्षक म्हणून आले आणि तिकीट घेऊन गेले, अशी टीका कार्यकर्त्यांनी केली. शिरीष सावंतांसमोर कार्यकर्त्यांनी जळगावकरांचा जयघोष केला होता. सावंत यांना मिळालेल्या उमेदवारीवरुन संदीप जळगावकर यांच्यासह दीडशे ते दोनशे पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी कृष्णकुंजवर बैठकीत नाराजी व्यक्त केली होती. शर्मिला ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांच्यासमोर उमेदवार बदलण्याची मागणी त्यांनी केली. मात्र, एकदा निर्णय झाल्याने उमेदवार बदलता येणार नसल्याचे नांदगावकर यांनी सांगितले. त्यानंतर आता संदीप जळगावकर यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात एक फेसबुक पोस्ट जळगावकर यांनी लिहीली आहे.
संदीप जळगावकर यांची फेसबुक पोस्ट
"आदरणीय राजसाहेब आणि शर्मिला वहिनी, आज तुमच्या मुळे आम्हाला ओळख मिळाली पक्षासाठी काम करताना व अनेक केसेस घेताना अभिमान वाटायचा,कधीही पक्षाच्या नावावर कोणाकडून एकही रूपया घेतला नाही स्वतःच्या मेहनतीचे करोडो रुपये आजपर्यंत पक्ष वाढवण्यासाठी खर्च करत आलो. कुठल्याही प्रकारची पर्वा न करता अनेक केसेस गेल्या १८ वर्षात अंगावर घेतल्या इतकी वर्ष कोणत्याही पदाची किंवा उमेदवारीची अपेक्षा न बाळगता पक्षासाठी निस्वार्थी काम केलं. २०१९ ला अनेक पदाधिकाऱ्यांना मागे लागलो परंतु भांडूप मधून विधानसभा लढवायला तयार नव्हते त्या वेळी मी भांडूप मधून विधानसभा लढवली आणि ताकदीने लढवली आणि भांडूप च्या जनतेने भरभरून प्रेम दिलं. आत्ता २०२४ विधानसभा निवडणूकीच्या २ महिने आधी मी स्वतः शिरिष सावंत साहेबांना बोललो कि तुम्ही भांडूप मधून निवडणूकिला उभे राहा.तेव्हा ते मला बोले कि मला नाही लढायचे आहे. आणि आज त्यांची उमेदवारी कोणत्याही भांडूप विधानसभेच्या पदाधिकार्यांना न विचारतां जाहीर झाली. त्या बद्दल त्यांचे मी अभिनंदन हि केले. एकाच गोष्टीचं वाईट वाटलं कि शिरीष सावंत यांनी भांडूपच्या पदाधिकार्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेतला असता तर आम्ही सर्वानी मोठ्या ताकदीने काम केलं असते. शिरीष सावंत यांच्या अश्या वागण्यामुळे त्यांचा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर असलेला अविश्वास दिसून येतो. तरी याच कारणांमुळे मी माझ्या मनसे विभाग अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे," असे संदीप जळगावकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, संदीप जळगावकर सुरुवातीपासून मनसेत होते. गेल्या विधानसभेला त्यांना ४२ हजार मते मिळाली होती. मुंबईतील मनसे उमेदवारांना मिळालेल्या मतांमध्ये जळगावकरांच्या मतांची संख्या सर्वात जास्त होती. त्यामुळे त्यांनाच उमेदवारी मिळेल असं वाटत होतं. तर शिरीष सावंत हे निरीक्षक म्हणून काम पाहत होते. मात्र तेही भांडूपमधून इच्छुक होते. त्यामुळे दोघांनीही कामाचा अहवाल पक्षाला दिला. त्यानंतर मंगळवारी रात्री शिरीष सावंत यांच्या नावाषी घोषणा झाली आणि जळगावकरांच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला.