अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 02:06 PM2024-11-16T14:06:56+5:302024-11-16T14:09:21+5:30
निवडणुकीच्या काळात बेकायदेशीर प्रकाराला आळा घालण्यासाठी तपास यंत्रणाकडून शहरात नाकाबंदी करून तपासणी केली जात आहे.
मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला ४ दिवस शिल्लक आहेत. २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगासह पोलीस यंत्रणा राज्यात प्रत्येक हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्यातच मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत एका ट्रकमधून तब्बल ८४७६ किलो चांदी जप्त केली आहे. या चांदीची किंमत जवळपास ८० कोटीपर्यंत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात चांदी पाहून पोलीस आणि निवडणूक अधिकारीही हैराण झाले. निवडणुकीत रोकड आणि बेकायदेशीर वस्तू पकडण्यासाठी भरारी पथके ठिकठिकाणी तैनात करण्यात आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मानखुर्द पोलिसांनी वाशी चेकनाका परिसरात नाकाबंदी लावली होती. याठिकाणी प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी पोलीस करत होते. शुक्रवारी रात्री उशिरा एक संशयित टॅम्पो वाशी चेकनाक्यावरून जात होता. पोलिसांनी हा ट्रक थांबवून त्याची पडताळणी केली. तेव्हा या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात चांदी सापडली हे पाहून अधिकारी चकीत झाले. या चांदीचे वजन केले असताना ती एकूण ८४७६ किलो असल्याचं समोर आले. सराफा बाजारात या चांदीची किंमत ८० कोटींच्या घरात आहे.
पोलिसांनी या प्रकारानंतर चालकाची चौकशी केली, मात्र ठोस उत्तर मिळत नसल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेची माहिती पोलिसांनी आयकर विभाग आणि निवडणूक आयोगालाही कळवली. आयकर विभाग आता जप्त केलेल्या चांदीची मालकी कुणाकडे आहे याचा तपास करत आहे. सुरुवातीच्या तपासात ही चांदी बेकायदेशीरपणे नेली जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. निवडणुकीचा काळ पाहता आयकर विभाग आणि निवडणूक आयोगाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे.
दरम्यान, चांदीच्या वाहतुकीची काही कायदेशीर कागदपत्रे आहेत का ते तपासले जात आहे. कुठल्याही बेकायदेशीर संपत्तीवर कठोर कारवाई करण्यात येईल असं पोलिसांनी सांगितले. मात्र या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्यात. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता यावी अशी स्थानिकांची मागणी आहे. जर जप्त केलेल्या चांदीचा मालक कोण, अधिकृत कागदपत्रे आढळली नाहीत तर संपूर्ण चांदी सरकारी तिजोरीत जाईल असं अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या या प्रकाराचा तपास सुरू आहे.