नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 01:07 PM2024-11-05T13:07:22+5:302024-11-05T13:08:23+5:30

दाऊदशी संबंधित असल्याचा आरोप भाजपानं नवाब मलिकांवर केला होता. मात्र याच नवाब मलिकांना महायुतीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्याने भाजपाची कोंडी झाली आहे. 

Maharashtra Assembly Election 2024 - Nawab Malik has always been our colleague, we stand by our decision - NCP Praful Patel | नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."

नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."

मुंबई - नवाब मलिक यांच्या उमेदवारीवरून महायुतीत मतभेद आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाने नवाब मलिकांना मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात उमेदवारी दिली आहे. मात्र आम्ही मलिकांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून घेण्यात आली आहे. मात्र कुणाला काहीही वाटलं तरी ठीक आहे, आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत असं सांगत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी भाजपा आणि शिंदे गटाला फटकारलं आहे.

प्रफुल पटेल म्हणाले की, नवाब मलिक हे आमचे पूर्वीपासूनचे सहकारी आहेत. ते मंत्री राहिलेत. त्यांच्यावर आरोप कुठलाही सिद्ध झाला नाही. आरोप सिद्ध झाला, काही निकाल लागला तर आपण त्यावर विचार करायचा असतो. अनेक नेत्यांवर आरोप होतात. सगळ्या पक्षात असे लोक आहेत त्यांच्यावर काही ना काही कारवाई झालेली आहे. काही मुख्यमंत्रीही आहेत. विद्यमान मुख्यमंत्री आहेत. सगळ्या पक्षातील मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे नवाब मलिक आमचे जुने सहकारी असल्याने त्यांना आम्ही जागा दिली आहे. कुणाला काही वेगळे वाटत असेल तर ठीक आहे परंतु आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत असं त्यांनी स्पष्ट केले.

तर भारताचं संविधान १९५० साली लागू झालं आहे. प्रत्येक भारतीयासाठी ती गर्वाची गोष्ट आहे. आज २०२४ मध्ये पुन्हा संविधानाबाबत संमेलन आयोजित करणे ही आनंदाची बाब आहे. परंतु त्यावर प्रश्नचिन्ह लावण्यासाठी नव्हे तर संविधानाचा गौरव करण्यासाठी होत असेल आनंद आहे. राहुल गांधींचा कार्यक्रम राजकीय षडयंत्र आहे. लोकसभेला ज्यारितीने संविधान बदललं जाणार असा फेक नरेटिव्ह केला ते चुकीचे ठरले. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक असल्याने नागपूरात संविधान संमेलन केले जात आहे. त्यामागे कसलेही तथ्य नाही. भारताचं संविधान अटळ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान जगात श्रेष्ठ आहे असं सांगत प्रफुल पटेल यांनी राहुल गांधी यांच्या नागपूरातील कार्यक्रमावर टीकास्त्र सोडले.

दरम्यान, कुठल्याही उमेदवाराने महिलेचा अपमान करू नये. ५० टक्के नारी शक्ती देशाची ताकद आहे. आपल्या देशात महिलांना पुढे आणलं जात आहे. महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीणसारखी योजना आणली आहे. महिलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी ही योजना आहे. मोदींनी सलग १० वर्ष महिला सशक्तीकरणासाठी काम केले. महिला आरक्षणाबाबत मोदींनी काँग्रेससारख्या बाता न मारता ते लागू केले. २०२९ च्या निवडणुकीत लोकसभा, विधानसभेत ३३ टक्के महिलांना जागा मिळाव्यात यासाठी कायद्यात दुरुस्ती केली असं सांगत प्रफुल पटेल यांनी सुनील राऊत यांनी केलेल्या विधानावर भाष्य केले आहे.

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 - Nawab Malik has always been our colleague, we stand by our decision - NCP Praful Patel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.