Vandre East Assembly constituency : महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतरही पक्षांतर सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. उमेदवार इकडून तिकडे जात असल्यामुळे राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत आहे. अशातच राष्ट्रवादीचे दिवंगत नेते बाबा सिद्दिकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकी याने आता अधिकृतपणे मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. पक्ष प्रवेशानंतर झिशान सिद्दीकी यांना वांद्रे पूर्व मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या या जागेवर शिवसेना ठाकरे गटाने वरुण सरदेसाई यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. उमेदवारी घोषित होताच झिशान सिद्दीकी यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
बाबा सिद्दीकींच्या पावलावर पाऊल ठेवत झिशान सिद्दीकी यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला. अजित पवार यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताच त्यांना तिकीट देण्याची घोषणा केली. यावेळीही ते वांद्रे पूर्व त्यांच्या जुन्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. झिशान सिद्दीकी हे काँग्रेसचे आमदार होते. काँग्रेसने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारीनंतर झिशान सिद्दीकी यांनी अजित पवार यांचे आभार मानत विक्रमी फरकाने जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
"महाविकास आघाडीने त्यांचे उमेदवार जाहीर केले आणि काँग्रेसची जागा शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) देण्यात आली, हे अत्यंत दुर्दैवी आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते आणि महाविकास आघाडीचे नेते माझ्या संपर्कात होते. पण त्यांच्या स्वभावातच फसवणूक करणं आहे. या कठीण काळात अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने माझ्यावर विश्वास ठेवला. हे माझ्या वडिलांचे अपूर्ण स्वप्न होते यासाठी लढताना त्यांचा खून झाला आणि मी त्यांची लढाई विक्रमी फरकाने जिंकणार आहे," असं झिशान सिद्दीकी यांनी म्हटलं.
"बाबा सिद्दीकींच्या मृत्यूनंतर अनेकांनी राजकीय भाष्य केलं. मी माझे वडील गमावले आणि आहेत आणि अशातही अनेकांनी राजकारण केलं. जर कुणाच्या रक्तातच बेईमानी असेल तर त्याला काही बोलू शकत नाही. मला काँग्रेसबद्दल काहीही बोलायला आवडणार नाही कारण ते नेहमीच शिवसेनेच्या दबावाखाली असतात. मी काँग्रेसमध्ये अनेक वर्षे घालवली आहेत, काँग्रेसने किंमत केली नाही. ठीक आहे. पण जेव्हा त्यांना कळेल की शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकेर) बरोबर नाही, तेव्हा मला वाटते की काँग्रेस कार्यकर्ते आणखी खूश होतील. राष्ट्रवादीने माझ्यावर विश्वास व्यक्त केला आहे या कठीण काळात ज्यांनी मला साथ दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो," असेही झिशान सिद्दीकी म्हणाले.
दरम्यान, झिशान सिद्दीकी यांनी २४ तासांपूर्वी त्यांच्या सर्व सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट टाकून मुंबईच्या राजकारणात एक नवीन ठिणगी उडवली आहे. झिशान यांनी त्यांच्या पोस्टमध्ये वांद्रे पूर्वमध्ये जुन्या मित्रांनी त्यांचा उमेदवार घोषित केल्याचे ऐकले आहे. सोबत राहणे त्यांच्या स्वभावातच नव्हते, असे म्हटलं आहे. तसेच तुमचा आदर आणि सन्मान करणाऱ्यांशीच संबंध ठेवा. आपापल्या फायद्यांसाठी जमलेल्या गर्दीचा काहीच फायदा नसतो. आता जनता निर्णय घेईल, असेही झिशान सिद्दीकी म्हणाले.