Join us

माझी बायको हिरोईन नाही म्हणून तिकिट मिळालं नसावं; शरद पवार गटातील इच्छुकाची खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 2:11 PM

अणुशक्तीनगर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून अभिनेत्री स्वरा भास्कर यांचे पती फहाद अहमद यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. 

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शरद पवार गटाकडून मुंबईतील अणुशक्तीनगर मतदारसंघात उमेदवार देण्यात आला आहे. समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमद यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आणि त्यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केले. मात्र या उमेदवारीमुळे अणुशक्ती मतदारसंघातील इच्छुक नाराज झाले आहेत. अणुशक्तीनगरमधील कार्यकर्त्यांना पक्षाचा हा निर्णय आवडला नाही. आम्ही चर्चा करून भूमिका जाहीर करू असं विधान राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाचे मुंबई कार्याध्यक्ष आणि प्रवक्ते निलेश भोसले यांनी म्हटलं आहे. 

निलेश भोसले म्हणाले की, ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अतिशय अडीअडचणीच्या काळात होती तेव्हा आमच्यासारखे छोटे छोटे कार्यकर्ते खिशात दमडी नसतानाही शरद पवारांचे विचार टिकले पाहिजे. महाराष्ट्राशी अजिबात धोका होता कामा नये. निष्ठेने आम्ही काम केले. अजित पवारांसोबत ३०-४० आमदार गेले. मंत्री गेले तरीही आम्ही डगमगलो नाही. ज्यावेळी पक्षाला चांगले दिवस येतील तेव्हा आमच्यासारख्या निष्ठावंतांचा पक्ष नक्कीच विचार करेल अशी अपेक्षा होती. परंतु समाजवादी पक्षातील नेत्याने पक्षात प्रवेश केला आणि थेट त्याला निवडणुकीचं तिकिट जाहीर केले त्यामुळे हा निर्णय दुर्दैवी आहे. अणुशक्तीनगरमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना हा निर्णय नक्कीच आवडणार नाही असं त्यांनी सांगितले. 

तर या मतदारसंघात २-३ इच्छुकांनी अर्ज केला होता. परंतु कदाचित आमच्यापैकी कुणाची बायको हिरोईन नसल्याने आम्हाला तिकिट मिळालं नसावं. आम्ही प्रमुख कार्यकर्ते हा पक्षाचा कणा आहे. जोपर्यंत कार्यकर्त्यांशी आम्ही बोलत नाही. त्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्याशिवाय आम्ही कुठलाही निर्णय घेणार नाही. कार्यकर्ते जे सांगतील त्याप्रकारे आम्ही निर्णय घेऊ. कार्यकर्त्यांच्या आदेशाचे पालन अणुशक्तीनगरमध्ये पुढच्या काळात होणार आहे. राष्ट्रवादी पक्षाचा मी प्रमुख कार्यकर्ता आहे. प्रत्येक कार्यकर्त्याचा मान सन्मान कसा जपला जाईल. आपल्या भूमिकेमुळे नवाब मलिकांना फायदा होणार असेल तर कार्यकर्त्यांच्या मानसन्माला ठेच पोहचणार नाही याचीही दक्षता मला घ्यावी लागेल. त्यामुळे कार्यकर्त्यांची मते जाणून घ्यावी लागतील असं निलेश भोसले म्हणाले. 

दरम्यान, ४ महिन्याआधी अणुशक्तीनगरमध्ये ज्या भाडोत्रीने घर घेतले, त्याला या परिसरातील कुठलेही प्रश्न माहिती नाहीत. ज्याप्रकारे १०-१५ वर्ष पूर्वीचे आमदार काम करत होते, त्यात जो फटका बसू शकतो. महायुतीचा उमेदवार जिंकू नये यासाठीही आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी कार्यकर्त्यांशी बोलून आम्हाला निर्णय घ्यावा लागेल असं सांगत निलेश भोसले यांनी पक्षाने दिलेल्या उमेदवारावर नाराजी व्यक्त केली. 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४अणुशक्ती नगरमुंबई विधानसभा निवडणूकराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारमहाविकास आघाडीनवाब मलिकस्वरा भास्कर