माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 05:19 PM2024-11-05T17:19:32+5:302024-11-05T17:21:53+5:30

माहिम मतदारसंघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. 

Maharashtra Assembly Election 2024 - No campaign tour of Uddhav Thackeray, Aditya Thackeray against MNS Candidate Amit Thackeray in Mahim constituency, hidden help to Raj Thackeray | माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...

माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...

मुंबई - यंदाच्या विधानसभा निवडणुकीत माहिम मतदारसंघातील लढतीकडे अनेकांचं लक्ष लागून राहिले आहे. या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे.  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र पहिल्यांदाच माहिम विधानसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार म्हणून उतरले आहेत. तर याठिकाणी महायुतीकडून शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना तिकिट मिळालं आहे. उद्धव ठाकरे यांनी या मतदारसंघात महेश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे माहिममध्ये कोण बाजी मारणार याकडे याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे.

सदा सरवणकर माघार घेणार अशी चर्चा उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुरू होती. मात्र सरवणकरांनी अर्ज मागे घेतला नाही. त्यात आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या निवडणूक प्रचार दौऱ्याचं वेळापत्रक समोर आले आहे. त्यात उल्लेखनीय म्हणजे माहिम मतदारसंघात उद्धव ठाकरे आणि आदित्य यांच्यापैकी कुणाचीही सभा नसल्याचं दिसून आले आहे. मुंबईत उद्धव ठाकरेंची मविआ नेत्यांसोबत पहिली जाहीर सभा ६ नोव्हेंबरला होणार असून ती बीकेसी मैदानात पार पडणार आहे. त्यानंतर १७ नोव्हेंबरला संध्याकाळी ७ वाजता आणि १८ नोव्हेंबर दुपारी ३ वाजता पुन्हा उद्धव ठाकरेंची सभा बीकेसी मैदानात होणार आहे.

उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील २२ विधानसभा मतदारसंघासाठी ३ सभा पार पडणार आहे. विशेष म्हणजे आदित्य ठाकरे हे मुंबईतल्या विविध मतदारसंघात प्रचार दौरा करणार आहेत. परंतु माहिम मतदारसंघात आदित्य ठाकरेंचा कुठलाही प्रचार दौरा नियोजित नाही. आदित्य ठाकरे हे मुंबईत ५ नोव्हेंबरला वडाळा, ९ नोव्हेंबरला शिवडी, वरळी, १० नोव्हेंबरला वरळी, भायखळा, १३ नोव्हेंबरला कुर्ला, कलिना, वांद्रे पूर्व मतदारसंघात आदित्य ठाकरेंची प्रचार सभा असेल. त्यानंतर १५ नोव्हेंबरला चेंबूर, घाटकोपर पश्चिम, वर्सोवा, १६ नोव्हेंबरला गोरेगाव, दहिसर, मागाठाणे इथं आदित्य ठाकरेंचा प्रचार दौरा असेल. त्यानंतर थेट १८ नोव्हेंबरला वरळी आदित्य ठाकरेंची प्रचार रॅली असणार आहे.

दरम्यान, माहिम हा शिवसेना बालेकिल्ला असून त्याठिकाणी शिवसेना भवन आहे त्यामुळे आम्ही तिथे उमेदवार देणारच असं खासदार संजय राऊत म्हणाले होते. मात्र महेश सावंत यांनी जेव्हा उमेदवारी अर्ज भरला तेव्हा शिवसेनेचे स्थानिक खासदार अनिल देसाई वगळता इतर कुठलेही बडे नेते सावंत यांचा अर्ज भरायला उपस्थित नव्हते. 

माहिममध्ये अमित ठाकरेंना छुपी मदत?

२०१९ च्या निवडणुकीत आदित्य ठाकरे पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले तेव्हा मनसे प्रमुख राज ठाकरेंनी तिथे वरळीत उमेदवार न उतरवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अमित ठाकरेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे उमेदवार देणार की नाही अशी चर्चा होती. परंतु उद्धव ठाकरेंनी उमेदवार दिला. त्यावरून भाजपासह विरोधकांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. परंतु  उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या १८ नोव्हेंबरपर्यंतचं प्रचार दौऱ्याचं नियोजन पाहता माहिम मतदारसंघात दोघेही येणार नसल्याचं चित्र समोर आले आहे. त्यामुळे काकांची पुतण्याला छुपी मदत आहे का अशी कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 - No campaign tour of Uddhav Thackeray, Aditya Thackeray against MNS Candidate Amit Thackeray in Mahim constituency, hidden help to Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.