मुंबईतील या २५ जागांवर राज ठाकरे महायुतीचं गणित बिघडवणार, मनसेची मतं निर्णायक ठरणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 02:06 PM2024-11-04T14:06:54+5:302024-11-04T14:07:41+5:30
Maharashtra Assembly Election 2024: या विधानसभा निवडणुकीत मुंबईमधील ३६ जागा खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत. अशा परिस्थितीत मुंबईतील २५ जागांवर राज ठाकरे यांच्या मनसेचे उमेदवार उभे असल्याने या ठिकाणचं गणित बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आता सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एकीकडे महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमध्ये मुख्य लढत होत आहे. तर लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत दीडशेच्या आसपास उमेदवार उतरवून निवडणुकीत रंगत आणली आहे. या निवडणुकीत मुंबईमधील ३६ जागा खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत. अशा परिस्थितीत मुंबईतील २५ जागांवर राज ठाकरे यांच्या मनसेचे उमेदवार उभे असल्याने या ठिकाणचं गणित बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मनसे मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघातील २५ मतदारसंघात निवडणूक लढवत आहे. मनसेने त्यापैकी २२ उमेदवार हे महायुतीविरोधात उतरवले आहेत. मुंबईमध्ये महायुतीकडून भाजपा १७ तर शिवसेना शिंदे गट १६ जागांवर निवडणूक लढवत आहे. मनसेने शिंदे गटाविरोधात १२ आणि भाजपाविरोधात १० मतदारसंघात उमेदवार दिले आहेत. त्याशिवाय आरपीआय आठवले आणि अजित पवार गटाच्या उमेदवारांविरोधातही मनसेकडून उमेदवार उतरवण्यात आला आहे. राज ठाकरेंच्या उमेदवारांमुळे या मतदारसंघांमध्ये महायुतीला फटका बसू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मनसेने महायुतीविरोधात वरळी, माहिम, मागाठाणे, कुर्ला, चांदीवली, भांडुप पश्चिम, विक्रोळी, वडाळा, वांद्रे पूर्व, चेंबूर, विलेपार्ले, वर्सोवा, गोरेगाव, कांदिवली पूर्व, दिंडोशी, जोगेश्वरी पूर्व, बोरिवली, चारकोप, दहिसर, मानखुर्द शिवाजीनगर, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम या मतदारसंघात उमेदवार दिले आहे. तर कुलाबा, वांद्रे पश्चिम, मालाड पश्चिम, मुलुंड, अंधेरी पश्चिम आणि सायन कोळीवाडा या मतदारसंघांमध्ये उमेदवार दिलेले नाहीत.