"इथल्या आमदारावर काय अन्याय झाला, बिल्डरांच्या कृपेने..."; राज ठाकरेंची प्रकाश सुर्वेंवर खरमरीत टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 09:47 PM2024-11-11T21:47:23+5:302024-11-11T21:48:27+5:30
मागाठाण्यातल्या सभेत राज ठाकरे यांनी विद्यमान आमदार प्रकाश सुर्वे यांच्यावर नाव न घेताना खरमरीत टीका केली.
Magathane Assembly Constituency : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचारसभा घेत आहेत. मुंबईतल्या उमेदवारांसाठीही राज ठाकरे यांनी चांगलाच जोर लावला आहे. या सभांमधून राज ठाकरे हे महायुती आणि महाविकास आघाडीला जोरदार लक्ष करत आहेत. महाविकास आघाडीची निर्मिती, शिवसेनेतील बंड आणि महायुतीचे सरकार या सगळ्या घटनांवर राज ठाकरे भाष्य करत आहे. मुंबईतल्या मागाठाणे इथल्या सभेतही राज ठाकरेंनी महायुती आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला. यावेळी राज ठाकरे यांनी विद्यमान आमदार प्रकाश सुर्वे यांच्यावर नाव न घेताना खरमरीत टीका केली.
मागाठाणे मतदारसंघात विद्यमान आमदार प्रकाश सुर्वे यांच्या विरोधात मनसेने नयन कदम यांना उमेदवारी दिली आहे. सोमवारी नयन कदम यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली. या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला. मुख्यमंत्री शिंदे यांच्या बंडाचा उल्लेख करताना राज ठाकरेंनी प्रकाश सुर्वेंवरही निशाणा साधला. प्रकाश सुर्वेंवर कोणता अन्याय झाला होता असा सवाल राज ठाकरे यांनी यावेळी केला.
"बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो समोर करून मत मागतात आणि वाटेल ते धंदे करतात. आम्ही भाबडेपणाने बाळासाहेबांच्या फोटोकडे बघून मतदान करतो. आतापर्यंत प्रचार सभेत काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बाळासाहेबांचे नाव घेतलेले नाही. यांच्या आघाड्यांमध्ये यांना बाळासाहेबांचे नाव घ्यायला लाज वाटत असेल तर काय बोलायचं यांच्या बद्दल. तुम्ही त्यांना मतदान केल्यानंतर हे जाऊन सत्तेत बसले. सत्तेतून हे ४० आमदार गेले इथल्या माणसासकट. या इथल्या आमदारावर काय मोठा अन्याय झाला होता. बिल्डरांच्या कृपेने जगतच होता. काही कारण नसताना पक्ष सोडून गेले. तुम्ही जे मतदान केलं त्याचा तुम्हाला हा अपमान वाटत नाही का," असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
"त्यांच्या ढांगे खालून हे ४० जण गेले. एकनाथ शिंदे यांना कारण विचारलं तर ते म्हणाले अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही. मग ते भारतीय जनता पक्षासोबत गेले. त्यांचा संसार सुरू होता. अचानक तिसरीने डोळा मारला गेला. ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसायला तयार नव्हते ते अजित पवार एकनाथ शिंदे च्या मांडीवर येऊन बसले आणि हे काही बोलू शकले नाहीत, असेही राज ठाकरे म्हणाले.