Join us

"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 10:55 PM

Raj Thackeray : उद्धव ठाकरेंच्या बॅगेत हात रुमाल आणि कोमट पाण्याशिवाय दुसरं काहीही असू शकत नाही, असा खोचक टोला राज ठाकरे यांनी लगावला.

Maharashtra Assembly Election 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईच्या भांडुपमध्ये उमेदवार शिरीष सावंत यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. यावेळी शिरीष सावंत यांच्या उमेदवारीवरुन पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी ते बाहेरचे असल्याची टीका केली होती. त्यावर बोलताना शिरीष सावंत हे आपलेच आहे. ते युपी बिहारचे आहेत का? उगाच आपल्या लोकांना बाहेरचे म्हणू नका, असं म्हटलं. तसेच यावेळी राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या बॅगांच्या केलेल्या तपासणीवरूनही भाष्य केलं. उद्धव ठाकरेंच्या बॅगेत हात रुमाल आणि कोमट पाण्याशिवाय दुसरं काहीही असू शकत नाही, असा खोचक टोला राज ठाकरे यांनी लगावला. “काल आणि आज उद्धव ठाकरेंची बॅग तपासली. खरं तर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना कुठं काय तपासावं हेसुद्धा कळत नाही. ज्या व्यक्तीच्या हातातून कधी पैसे सुटला नाही, त्या व्यक्तीच्या बॅगेत काय असणार आहे? फार फार तर हात रुमाल आणि कोमट पाणी, याशिवाय दुसरं काहीही असू शकत नाही. उद्धव ठाकरेंची बॅग तपासल्यानंतर आता त्याचा मोठा बाऊ केला जातो आहे. मुळात बॅग तपासण्यात गैर काय? अनेकदा आमच्याही बॅगा तपासण्यात आल्या. निवडणूक अधिकारी त्यांचं काम करत असतात. त्याचा एवढा तमाशा करायची गरज काय. त्यातही ते संबंधित अधिकाऱ्यांचा व्हिडीओ काढतात. त्याला नियुक्त पत्र दाखवायला सांगतात. कोणताही अधिकारी नियुक्ती पत्र खिशात घेऊन फिरतो का? कुणाला काय विचारावं, हेही उद्धव ठाकरेंना माहिती नाही. त्यांना फक्त मला मुख्यमंत्री करा बाकी तेल लावत गेलं. या लोकांनी सगळा तमाशा करून ठेवला आहे," असं राज ठाकरे म्हणाले. 

"कोकणात नाणार प्रकल्पाला विरोध झाला. रद्द झाल्या झाल्या हा प्रकल्प बारसूला नेला. त्यासाठी पाच हजार एकर जमीन आली कुठून. पाया खालची जमीन काढून नेली ते समजलं नाही. जमीन तयार कशी झाली, विकली कोणी, कोणी विकत घेतली तुम्हाला याचा थांगपत्ता नाही. बाजूच्या गुजरात मध्ये जा शेतीची जमीन विकत घ्यायची असेल तर गुजरात मधलाच शेतकरी लागतो. तिथे शेतीच करावी लागते. प्रत्येक राज्य जमिनी माणसं जपतं. आपल्याकडेच फक्त लिलाव लागतो. बाहेरून येणाऱ्यांना फुकट घर. गिरणी कामगार रस्त्यावर, पोलीस रस्त्यावर. का त्यांची मुंबई नाही," असा सवाल राज ठाकरेंनी केला.

"मराठवाड्यात एका कुटुंबात एका व्यक्तीचं निधन झालं. त्याच्या घरात तीनच माणसं. तिरडी उचलायला चौथा माणूस नव्हता. एकही माणूस आला नाही मदतीला. पाच वर्षांत खेळीमेळीने राहणारी माणसं इथपर्यंत महाराष्ट्र आणला. महाराष्ट्रात शरद पवार नावाचे संत आले. ज्यांनी जाती जातीमध्ये राजकारण केले. पुण्यात भुजबळ पुणेरी पगडी घालण्यात आली. ती पवारांनी काढायला लावली आणि फुलेंची पगडी घालायला लावली. भाषणात ती पगडी वापरायची नाही असे त्यांनी सांगितले. हा जातीवाद नाही.  राष्ट्रवादीच्या जन्मानंतर पवारांनी दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण करण्याचं राजकारण केलं आहे," अशी टीका राज ठाकरेंनी केली.

"माझं स्वप्न खुर्चीसाठी नाही. गेलेलं गतवैभव महाराष्ट्राला परत मिळवून देणे हेच स्वप्न आहे. जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवावा ही माझी इच्छा आहे. जगात होऊ शकतं तर महाराष्ट्रात का नाही. जमिनी बिल्डरांच्या घशात घालायच्या. या सगळ्या गोष्टी मला साफ करायच्या आहेत. परदेशी गेलेले तरुण त्यांना परत यावे असे वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे. शिरीष सावंत युपी बिहारचे नाहीत. इथलेच, कोकणातले आहेत. प्रचार जाऊदेत भांडुपकरांनो इथे राज ठाकरे उभा आहे हे समजां. बेसावध राहू नका. एकदा आजमावून बघा," असं आवाहन राज ठाकरेंनी केलं.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४मुंबई विधानसभा निवडणूकभांडुप पश्चिमराज ठाकरेउद्धव ठाकरे