Chandivali Assembly Constituency : मुंबईतल्या चांदिवली विधानसभा मतदारसंघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रचारसभा घेतली. या सभेत राज ठाकरे यांनी त्यांचे जुने सहकारी विद्यमान आमदार दिलीप लांडे यांच्यावर नाव न घेता जोरदार निशाणा साधला. शिवसेना शिंदे गटाने दिलीप लांडे यांना चांदीवली मतदार संघातून उमदेवारी दिली आहे. दिलीप लांडे २०१७ पर्यंत मनसेचे नगरसेवक होते. त्यानंतर त्यांनी बंडखोरी करत सहा नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश केला होता. चांदिवलीतल्या सभेत बोलताना राज ठाकरेंनी या गद्दाराने केसाने गळा कापला, त्याला अद्दल घडवा असं म्हटलं आहे.
चांदीवली येथे मनसेचे उमेदवार महेंद्र भानुशाली यांचा प्रचार सभेत बोलताना राज ठाकरेंनी दिलीप लांडे यांच्यावर जोरदार टीका केली. भाषण करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दिलीप लांडे यांच्यावर प्रचंड संतापले होते. ही असली विकली जाणारी लोक तुम्हाला हवी आहेत का असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी केला.
"इथे दोन लांडे उभे आहेत. त्यातला एक तर गद्दार आहे. हरामखोर हा शब्द सुद्धा कमी पडेल. या लोकांना आम्ही काय नाही दिलं. नगरसेवक झाले. महानगरपालिकेत स्थायी समितीमध्ये चार चार वर्ष बसले. बाकीच्यांना संधी द्यायला पाहिजे म्हणून बाजूला केल्यावर हा माणूस शिवसेनेकडे विकला गेला. हा सहा नगरसेवक घेऊन विकला गेला ज्यावेळी माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये होता. मी त्यावेळी त्या सगळ्या गोष्टींमधून जात होतो आणि त्यावेळी हा माणूस पैसे घेऊन तिकडे विकला गेला. मग त्यांनी आमदारकी दिली. मग हा आमदार झाला आणि त्याच्यानंतर दुसरीकडे विकला गेला. म्हणजे मला सांगा हा इथून माणूस तिथे विकला जातो आणि तिथून हा इथे विकला जातो. असली विकली जाणारी लोक तुम्हाला हवी आहेत. यांच्यावर कोण विश्वास ठेवेल. बिल्डरांच्या खिशातली ही माणसं आहेत," असे राज ठाकरेंनी म्हटलं.
"त्यांना आता विकले गेल्याने बरेच पैसे मिळाले आहेत. तेच पैसे हे आता बाहेर काढतील. त्यामुळे त्यांनी पैसे दिले तर ते घ्या. पैसे घेवून त्यांना जमिनदोस्त करा. हा माणूस काय लायकीचा आहे याची आठवण करू देण्यासाठी मी चांदीवलीत सभा घेत आहे. ही माणसं कोणाचीच नसतात. ही माणसं कोणाच्या बापाचीही नाहीत. ते कोणाचेही होवू शकत नाहीत. ते केसाने तुमचाही गळा कापायला मागे पुढे पाहाणार नाहीत," असंही राज ठाकरे म्हणाले.