“विधानसभा लढवणार, जिंकणार अन् सत्ता आणणार”; राज ठाकरेंचा निर्धार, युतीबाबत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 02:56 PM2024-10-16T14:56:42+5:302024-10-16T14:56:42+5:30
Maharashtra Assembly Election 2024 Raj Thackeray PC: विधानसभा निवडणुका आम्ही जिंकू आणि सत्ता आणू, असा निर्धार राज ठाकरे यांनी मुंबईत व्यक्त केला.
Maharashtra Assembly Election 2024 Raj Thackeray PC: अखेर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. आचारसंहिता लागू होताच राज्यातील राजकारणाला वेग आला आहे. विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच मनसेच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत विजयाचा निर्धार व्यक्त केला.
पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, विधानसभा निवडणुका लढवणार आणि जोरात लढवणार आहे. माझ्या सभेत सहज म्हणून किंवा कार्यकर्त्यांचा, सहकाऱ्यांचा उत्साह वाढावा म्हणून काही बोललो नाही. विधानसभा निवडणुका आम्ही जिंकू आणि सत्ता आणू. माझी भूमिका मी मांडली आहे, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच महायुती सोबत जाण्याच्या प्रस्तावावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, जर-तरची चर्चा करत नाही. मी माझ्या सभेत बोललो ते बोललो आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
सरकारने निर्णय घेतला त्याचे लोकांना समाधान आहे
टोलमाफीसाठी आमचीच मागणी होती. खूप पूर्वीपासून आम्ही ही मागणी करत होतो. टोलमुळे आपली फसवणूक होते हा मुद्दाच आम्ही मांडला. टोलमाफी झाली यामुळे मी सरकारचे आभार मानतो. उशिरा का होईना त्यांना या गोष्टी समजल्या. मला काळजी फक्त एकाच गोष्टीची आहे, ती म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर टोल नाके बंद करायचे आणि निवडणुकीनंतर पुन्हा सुरु करायचे हे चालणार नाही. यापूर्वी अशा गोष्टी घडलेल्या आहेत. ही गोष्ट आता नको, नंतर सुरु केल्या. अनेकांनी शब्द दिला टोलनाके बंद करतो. सरकारने निर्णय घेतला त्याचे लोकांना समाधान आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
दरम्यान, टोलमाफीची मागणी काँग्रेस सरकार होते तेव्हापासून आमची होती. किती पैसे येतात आणि किती जातात हे कळायला मार्ग नाही. हा व्यवहार कॅशवर होता. किती गाड्या आल्या, गेल्या, कुणाच्या खिशात किती पैसे गेले हे कळत नव्हते. आता श्रेय घ्यायला लोक येतील. ज्यांचा संबंध नाही ते येतील. पण हे आंदोलन कुणी केले हे सगळ्यांना माहिती आहे, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.