"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 01:51 PM2024-11-18T13:51:04+5:302024-11-18T13:51:36+5:30

Raj Thackeray : शिवडी विधानसभा मतदारसंघातील सभेत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

Maharashtra Assembly Election 2024 Raj Thackeray strongly criticized Uddhav Thackeray in a meeting in Shivdi assembly constituency | "शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Shivadi Assembly Constituency : शिवडी विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेवटची सभा घेतली. शेवटच्या सभेत राज ठाकरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्रात २०१९ पासून जे काही झालं त्याला उद्धव ठाकरे नावाची व्यक्ती जबाबदार असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना भांडखोर सासूची उपमा दिली. तसेच ज्यांनी तुमच्या मतांचा अपमान केला त्यांना तुम्ही अद्दल घडवली पाहिजे, असंही आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे.

"महाराष्ट्रातल्या मशि‍दींवरचे भोंगे मी खाली आणायला सांगितले. त्यानंतर भोंगे खाली आले पण. आम्ही भोंगे बंद करतो पण हनुमान चालिसा म्हणू नका असं सांगितले. उद्धव ठाकरे त्यावेळी मुख्यमंत्री होते. त्यावेळी १७ हजार मनसे कार्यकर्त्यांवर त्यावेळी सरकारने गुन्हे दाखल केले. मशिदींवरच्या लाऊड स्पिकरला संरक्षण देण्यात आलं. बाळासाहेबांनी अनेक सभांमध्ये सांगितलं होतं की मशि‍दींवरचे भोंगे खाली आले पाहिजेत. जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? मनसे कार्यकर्त्यांवर तुम्ही गुन्हे दाखल करता त्यावरुन तुमचा कल कळला आहे," असं राज ठाकरे म्हणाले.

"काँग्रेस आणि राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करते. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा घ्यायला ज्यांना लाज वाटते त्यांच्याबरोबर जाऊन उद्धव ठाकरे बसले आहेत. मला मुख्यमंत्री करा आणि स्वतःच्या स्वार्थासाठी ते जाऊन बसले होते. एका माणसाने आख्ख्या पक्षाची वाट लावली. अनेक लोक निघून गेले त्यांना हे गद्दार म्हणत आहेत. गद्दार तर घरात बसला आहे ज्याने पक्षासोबत गद्दारी केली. शिवसेनेची जी सासू आतमध्ये बसली आहे  तिचा प्रॉब्लेम आहे. ज्यांनी तुमच्या मतांचा अपमान केला त्यांना तुम्ही अद्दल घडवली पाहिजे. हे जर परत निवडून आले तर महाराष्ट्र संपला म्हणून समजायचे तुम्ही. २०१९ पासून जे काही झालं ते विसरु नका. या सगळ्या गोष्टीला कारणीभूत एकच माणूस आहे तो म्हणजे उद्धव ठाकरे," असंही राज ठाकरे म्हणाले. 

"या माणसाच्या वागणुकीमुळे नारायण राणे, मी, एकनाथ शिंद बाहेर पडले. मग बाळासाहेबांना त्रास देऊन जाणाऱ्या छगन भुजबळांना उद्धव ठाकरे मातोश्रीवर जेवायला बोलवतात. भुजबळांनी त्रास दिला त्याचे काही देणेघेणे नाही आणि बाकीचे यांचे शत्रू आहेत. गेल्या पाच वर्षात काय झालं, हा माणूस कसा वागला , करोना काळात कसा वागला. या सगळ्या गोष्टी आठवा आणि २० तारखेला मतदानाला जा," असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.
 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 Raj Thackeray strongly criticized Uddhav Thackeray in a meeting in Shivdi assembly constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.