राज‘पुत्रा’च्या उमेदवारीने माहीमची लढत रंगतदार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 09:40 AM2024-11-07T09:40:24+5:302024-11-07T09:41:31+5:30

Maharashtra Assembly Election 2024: जेथे शिवसेनेची स्थापना झाली, तो माहीमचा बालेकिल्ला राखण्यासाठी दोन्ही सेनेमध्ये चुरस असताना मनसेचे अमित ठाकरे यांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक रंगतदार झाली आहे.

Maharashtra Assembly Election 2024: Raj Thackeray's Son's candidature makes Mahim's fight colorful | राज‘पुत्रा’च्या उमेदवारीने माहीमची लढत रंगतदार

राज‘पुत्रा’च्या उमेदवारीने माहीमची लढत रंगतदार

- अमर शैला 
मुंबई - जेथे शिवसेनेची स्थापना झाली, तो माहीमचा बालेकिल्ला राखण्यासाठी दोन्ही सेनेमध्ये चुरस असताना मनसेचेअमित ठाकरे यांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक रंगतदार झाली आहे. उद्धवसेना, शिंदेसेना आणि मनसे या तिन्ही पक्षांचे या मतदारसंघात प्राबल्य असल्याने विजय खेचून आणण्यासाठी उमेदवारांना  संघर्ष करावा लागणार आहे. 

राज ठाकरे यांचे पुत्र अमित यांच्यामुळे माहीमची निवडणूक मनसेसाठी प्रतिष्ठेची झाली आहे, तर त्यांच्यासमोर विद्यमान आ. सदा सरवणकर आणि उद्धवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत यांचे आव्हान आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला पाठिंबा दिला होता. त्यामुळेच राहुल शेवाळे यांना माहीममधून १३,९९० मताधिक्य मिळाले होते. शेवाळे यांना दादर, प्रभादेवीतून, तर माहीम परिसरातून उद्धवसेनेचे अनिल देसाई यांना लीड मिळाला होता. त्यामुळेच महायुतीच्या उमेदवारासाठी ही निवडणूक सोपी वाटत होती. मात्र, अमित ठाकरेंच्या उमेदवारीने आता निवडणूक तिरंगी होणार आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी माहीममध्ये मनसेला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. मात्र, सरवणकर यांनी माघार न घेतल्याने आता भाजपसमोरही पेच आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे  
    शिवाजीपार्कसह दादर परिसरातील मैदानांच्या धुळीची समस्या.
    दादर चौपाटीच्या अस्वच्छतेचा प्रश्न. 
    जुन्या इमारतींसह माहीम कोळीवाड्याच्या पुनर्विकासाचा पेच.
    कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा.

मराठी मतदारांचा कल कुठे?
माहीममध्ये साधारणपणे एक लाख २१ हजार मराठी मतदार आहेत. हा मतदार शिवसेनेसोबत राहिला आहे. तसेच, मनसेच्या स्थापनेनंतर तो या पक्षाकडेही वळला आहे. त्यातून आता दोन्ही सेना आणि मनसेमध्ये मराठी मतदारांची विभागणी होण्याची चिन्हे आहेत. या खालोखाल जवळपास २२ हजार गुजराती आणि राजस्थानी, २० हजार उत्तर भारतीय मतदार असून, त्याच्यावर भाजपची चांगली पकड आहे. 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024: Raj Thackeray's Son's candidature makes Mahim's fight colorful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.