महायुतीत फूट, शिंदे गटाला धक्का; भाजपा करणार मनसे उमेदवार अमित ठाकरेंचा प्रचार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2024 01:21 PM2024-11-03T13:21:19+5:302024-11-03T13:23:00+5:30
आम्हीदेखील मोठं मन दाखवून राज ठाकरेंनाही मदत केली पाहिजे. सदा सरवणकर हे ज्येष्ठ नेते आहेत. एकनाथ शिंदे त्यांची समजूत घालतील असं भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले.
मुंबई - माहिम मतदारसंघावरून महायुतीत मतभेद समोर आले आहेत. याठिकाणी एकनाथ शिंदे गटाने विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे. तर मनसेने या मतदारसंघात राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. उद्धव ठाकरे यांनीही महेश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे माहिममधील लढत तिरंगी होणार आहे. अशावेळी भाजपानेअमित ठाकरेंना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे.
याबाबत भाजपाचे आमदार प्रसाद लाड म्हणाले की, आपल्या कुटुंबातील मुलगा निवडणूक लढवत असेल आणि तो राज ठाकरेंचा मुलगा असेल, त्याला आम्ही आमच्या मुलासारखं समजतो तेव्हा आम्हीदेखील मोठं मन दाखवून राज ठाकरेंनाही मदत केली पाहिजे. सदा सरवणकर हे ज्येष्ठ नेते आहेत. एकनाथ शिंदे त्यांची समजूत घालतील असं त्यांनी सांगितले.
तसेच विधानसभा असो वा विधान परिषद शेवटी आमदार हा आमदार असतो. सदा सरवणकर हे जनतेतून निवडून गेले असतील तरी त्यांची समजूत काढून त्यांना विधान परिषदेची संधी दिली जाईल. सिद्धीविनायक न्यास समितीचं अध्यक्षपद आणि राज्यमंत्रिपदाचा ५ वर्ष दर्जा सरवणकरांना दिलाय. त्यामुळे कदाचित सरवणकर माघार घेतील असं वाटतं, मात्र भाजपाची भूमिका स्पष्ट आहे आम्ही अमित ठाकरेंचा प्रचार करू असंही भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?
दरम्यान, काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनीही माहिम मतदारसंघावरून मत व्यक्त केले होते. अमित ठाकरेंना मदत करावी असं मत भाजपाचं होतं आणि आहे. मुख्यमंत्र्यांचेही मत त्यापेक्षा वेगळे नाही. मी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे गेलो होतो. एखादी जागा अदलाबदल करून घेऊ असंही सांगितले. मुख्यमंत्र्यांनी तो प्रयत्न करून पाहिला. तिथले जे उमेदवार आहेत त्यांना बोलवून चर्चा केली पण त्यांच्या पक्षातील नेत्यांचे मत असं आहे, जर ते लढले नाहीत तर ती मते थेट उबाठाकडे जातील. त्यातून दोघांचे नुकसान होईल. त्यामुळे त्यांनी काही ऐकलं नाही असं फडणवीसांनी सांगितले पण अजूनही माझे स्पष्ट मत आहे, राज ठाकरे यांनी जी काही लोकसभेला मोदींसाठी मदत केली, त्यामुळे या एका जागेवर राज ठाकरेंना किंवा अमित ठाकरेंना समर्थन दिले पाहिजे असं भाजपाचं स्पष्ट मत आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी त्यांनी सांगितले होते.