मानखुर्दमध्ये अबु आझमींची ठाकरे गटाच्या शाखेला भेट; ठाकरेंचे शिवसैनिक करणार प्रचार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 04:05 PM2024-11-05T16:05:42+5:302024-11-05T16:07:58+5:30
मानखुर्द शिवाजीनगर, भिवंडी पूर्व या जागा महाविकास आघाडीकडून समाजवादी पक्षाला सोडण्यात आल्या आहेत.
मुंबई - विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यात महाविकास आघाडीकडून समाजवादी पक्षाला २ जागा सोडण्यात आल्या आहेत. त्यात मानखुर्द शिवाजीनगर, भिवंडी पूर्व जागेचा समावेश आहे. मानखुर्द शिवाजीनगर भागात समाजवादी पक्षाने त्यांचे प्रदेशाध्यक्ष अबु आझमी यांना उमेदवारी दिली आहे.
निवडणुकीचं बिगूल वाजल्यापासून अबू आझमी मानखुर्द शिवाजीनगर भागात प्रचार करत आहेत. मंगळवारी अबु आझमी यांनी मानखुर्दच्या PMGP कॉलनीतील शिवसेना ठाकरे गटाच्या शाखेला भेट दिली. यावेळी आझमींनी उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत प्रचाराबाबत चर्चा केली. आम्ही एकत्रित मिळून संविधान वाचवायचं आहे आणि भाईचारा पुढे न्यायचा आहे, जय महाराष्ट्र अशी पोस्ट त्यांनी केली आहे.
६ ठिकाणी समाजवादी पक्षाची मैत्रीपूर्ण लढत
समाजवादी पक्षाला महाविकास आघाडीत २ जागा दिल्या आहेत परंतु अन्य ८ ठिकाणी सपाने त्यांचे उमेदवार उभे केलेत. त्याठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. समाजवादी पक्षाने मविआवर नाराजी व्यक्त केली. आम्हाला २ जागा द्यायच्या होत्या तर आम्ही घेतल्या असत्या. मविआत चर्चा व्हायला हवी होती. आम्ही त्याच जागा मागितल्या जिथे मविआचा कुठलाही उमेदवार निवडून आला नव्हता. ज्याठिकाणी आम्ही लढत नाही तिथे मविआचा प्रचार करायला कार्यकर्त्यांना सांगितल्याचे अबु आझमी यांनी म्हटलं.
दरम्यान, अल्पसंख्याकांचं काळजी कुणी घेत नाही. परंतु काँग्रेस काळात बुरखा घालण्यास बंदी नव्हती. गाईच्या नावावर मुस्लीमांना मारले जात नव्हते. लव्ह जिहाद, दहशतवादी म्हणून मुस्लिमांना त्रास दिला जात नव्हता परंतु काँग्रेस-राष्ट्रवादीने ५ टक्के मुस्लीम आरक्षण दिले होते, त्यानंतर ते कोर्टात टिकले मात्र पुन्हा त्यांनी आरक्षण दिले नाही. एनआरसीविरोधात मविआ आहे. देशाची संपत्ती विकली नाही. वक्फ बोर्डवर कब्जा करण्याची भाषा मविआ करत नाही त्यामुळे भाजपा आणि मविआत ते अंतर आहे असं अबु आझमी यांनी सांगितले.