मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 02:25 PM2024-11-17T14:25:52+5:302024-11-17T14:27:30+5:30

गाय आणि बैलाच्या नावाने कित्येक मुसलमान तरूणांना मारले गेले, २०१४ च्या आधी देशात असे कधी घडले होते का? आज मुली बुरखा घालून शाळेत जातात, त्यांना बुरखा बंदी करण्याचा प्रयत्न होतोय. भाजपा सरकार आल्यापासून हे सुरू झाले असा आरोप अबु आझमींनी केला. 

Maharashtra Assembly Election 2024 - Samajwadi Party leader Abu Azmi criticized BJP | मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल

मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल

मुंबई - अबकी बार ४०० पार बोलणारे इंडिया आघाडी एकत्र झाले तेव्हा २४० वर कोसळले, या भागात उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून संजय पाटील लढत होते. प्रत्येक ठिकाणी ते हरले मात्र इथून दीड लाख मतदान मिळाले. मुसलमानांनी वाचवलं असं सांगत समाजवादी पक्षाचे उमेदवार अबु आझमी यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

मानखुर्द शिवाजीनगर परिसरातील जाहीर सभेत अबु आझमी म्हणाले की, मुसलमान हा देशातील सर्वात जास्त पुरोगामी आहे. तो कधी हिंदू मुस्लीम बघत नाही. २०१४ सालानंतर जे बुरखा बंदी करू इच्छितात, मुसलमानांना टार्गेट करतात त्यांना आम्ही जिंकू देणार नाही हे ठरवलं होते. या भागातून आपल्याला मत मिळणार नाही, मग त्यात फूट पाडा असं भाजपाला वाटलं. त्यामुळे त्यांनी आता दोघांना पाठवले एक घड्याळवाला आणि धनुष्यबाणवाला इथं उभा केला आहे असा टोला त्यांनी लगावला. 

तसेच  मी ३ वेळा मानखुर्द शिवाजीनगरमध्ये आमदार राहिलोय, तिन्ही वेळा मताधिक्य वाढत राहिले. चौथ्यांदा मी निवडणूक लढवत आहे. लोकांच्या आग्रहास्तव मी पुन्हा लढत आहे. मला हरवण्यासाठी इथं काहींना पाठवले, ते मत खाण्यासाठी आलेत. आपल्या जमिनीवर भाजपाचं पाऊल पडता कामा नये. भाजपाचा भरवसा नाही, ज्यारितीने धारावी विकली तसं त्यांना गोवंडी विकायचं आहे. कुठल्याही मुस्लीम देशात जर कुणी अल्लाहला काही बोललं तर त्याला फाशी दिली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने एक कांदबरी लिहिली गेली, जेम्स लेनच्या पुस्तकात त्यांचा अपमान करण्यात आला. पुण्यातील संग्रहालयात ती कांदबरी पोहचली तेव्हा महाराष्ट्रीयन लोकांनी संपूर्ण संग्रहालय जाळून टाकले. तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी सांगितले, आम्ही जेम्स लेनला अमेरिकेवरून आणून खटला दाखल करू...पण आज आमच्या रसूलुल्लाहला ज्यांच्यासाठी मी माझा जीव देऊ शकतो. मात्र ज्यांनी त्यांचा अपमान केला ते देवेंद्र फडणवीस, अजित पवारांच्या बाजूला बसलेत असं सांगत अबु आझमींनी नितेश राणेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला. 

दरम्यान, जगात कुठल्याही देशात गेला, तिथे मुल जन्माला आले तर त्याला देशाचे नागरिकत्व मिळते. आज आपल्याकडे भारतात प्रमाणपत्र मागितले जाते. जगात कुठूनही कुणी येऊ शकते पण मुसलमान येऊ शकत नाही. मुसलमानांची चूक काय? परिस्थिती खूप खराब आहे. नारायण राणेचा मुलगा मशिदीत घुसून मारण्याची भाषा करतोय. या देशाला स्वातंत्र करण्यासाठी आम्ही कुठे कमी पडलो? या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जितके लढलेत त्यात मुसलमान कमी नव्हते. गाय आणि बैलाच्या नावाने कित्येक मुसलमान तरूणांना मारले गेले, २०१४ च्या आधी देशात असे कधी घडले होते का? आज मुली बुरखा घालून शाळेत जातात, त्यांना बुरखा बंदी करण्याचा प्रयत्न होतोय. भाजपा सरकार आल्यापासून हे सुरू झाले. १९४७ मध्ये मुसलमान सर्व सामान घेऊन पाकिस्तानात जात होता, तेव्हा दिल्लीच्या जामा मशि‍दीतून मौलाना अब्दुल कलाम आझाद यांनी ओरडून सांगितले, मुसलमानांनी देश सोडून जाऊ नये, तुमच्या दर्गा बंद पडतील. तुमच्या लाखो मशिदी अशाच पडून राहतील कुणी नमाज पठण करणारा मिळणार नाही. लाल किल्ला, ताजमहल यांचा हवाला दिला, तेव्हा मुसलमान इथं थांबला. न्याय मिळेल असं वाटले, पण कुठला न्याय मिळाला. १९४९ च्या दंगलीत एका जिल्हाधिकाऱ्याने मूर्ती ठेवली, ती हटवली नाही त्यानंतर १९९२ ला एक मशिद शहीद झाली. पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांच्या हातात अधिकार दिले जातायेत असा आरोपही अबु आझमी यांनी केला. 

अमित शाहांचं स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही 

आज महाराष्ट्रातील ३६ जिल्हाधिकारी एका वक्फ बोर्डच्या सीईओखाली काम करतात पण आता हे लोक सांगतायेत, ३६ जिल्हाधिकारी मालक असतील आणि वक्फ बोर्डाचा सीईओ त्यांच्या हाताखाली काम करेल. जर जिल्हाधिकाऱ्याने सांगितले ही दर्गा एका व्यक्तीच्या मालकीची आहे तुम्हाला खाली करावी लागेल तर त्याला अपील करता येणार नाही. या देशात सर्वात जास्त जमीन संरक्षण खात्याकडे आहे जी सरकारने दिलीय, त्यानंतर रेल्वेकडे आहे जी सरकारने दिलीय. मग वक्फकडील ९ लाख एकर जमीन ही मुसलमानांची आहे. ज्यांनी दर्गा, मशीद, कब्रस्तानासाठी वक्फ केली आहे. अल्लाहच्या नावे असलेल्या जमिनीवर कब्जा केला जात आहे. भूमाफियांनी देशातील सर्व संपत्ती विकली आहे. अमित शाह यांचं स्वप्न समाजवादी पक्ष कधी पूर्ण होऊ देणार नाही असा इशारा अबु आझमी यांनी दिला. 

देशाच्या स्वातंत्र्यात मुसलमानांचेही योगदान 

आम्ही देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिले आहे. इन्कलाब जिंदाबाद नारा देणारा हसरत मोहानी ते मुसलमान होते, भारत छोडो नारा देणारे युसूफ मेहर अली तेही मुसलमान होते. क्विट इंडिया मोहिम चालवणारे युसूफ मेहर अली होते. आज जय हिंद बोलले जाते, मात्र जय हिंद नारा देणारे आबिद हसन सफरानी हेही मुसलमान होते. सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्तां हमारा हे गीत देणारे अल्लमा इक्बाल होते तेही मुसलमान होते. १८५७ साली 'मादरे वतन भारत की जय' बोलणारे अझीमुल्ला खान हेही मुसलमान होते. मादरे वतन म्हणजे भारत माता, जय म्हणजे जिंदाबाद मी भारत माता की जय बोलू शकतो. तिरंग्याचा रंग हा कुणी दिला आहे, सुरैय्या तय्यबजी हेही मुसलमान होते. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल मै है बोलणारे बिस्मिल अजीमाबादी हेदेखील मुसलमानाने दिले होते अशी आठवण अबु आझमी यांनी करून दिली. 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 - Samajwadi Party leader Abu Azmi criticized BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.