भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 09:00 AM2024-11-19T09:00:59+5:302024-11-19T09:03:00+5:30
धारावी, मुंबई एअरपोर्ट अदानीला दिले, मुंबईतील मिठाघरे, जकात, टोलनाके अदानींना मग आमच्याकडे काय उरले? असा सवाल करत संजय राऊतांनी महायुतीवर निशाणा साधला.
मुंबई - मानखुर्द शिवाजीनगर या भागात आमचे अबु आझमी निवडणूक लढवतात आणि जिंकतात. यावेळीही आमच्या मित्राला भरघोस मतांनी जिंकवा. या महाराष्ट्रासाठी एक एक जागा खूप महत्त्वाची आहे. अबु आझमी यांनी नेहमी पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष राजकारण केले. आमच्यासोबत संसदेत होते, विधानसभेत आले संघर्ष करून इथपर्यंत पोहचलेत असं कौतुक करत खासदार संजय राऊत यांनी प्रचारसभेत भाजपा, मनसे आणि एकनाथ शिंदेंवर टीका केली.
मानखुर्दच्या सभेत संजय राऊत म्हणाले की, हम एक है और एक रहेंगे. महाराष्ट्राचे २ दुश्मन आहेत एक नरेंद्र मोदी आणि दुसरे अमित शाह. महाराष्ट्रात तुम्ही कुणाशी लढताय असा प्रश्न लोक विचारतात तेव्हा आम्ही भाजपा नाही, मनसे नाही, एकनाथ शिंदे या लोकांची आमच्यासोबत लढण्याची लायकी नाही. २३ तारखेला गुजरातमध्ये फटाके फुटू नये असं वाटत असेल तर २० तारखेला महाविकास आघाडीला मतदान करा. अबकी बार ४०० पार हे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांनी '४०० पार'ला बूच लावली. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशने मोदींचे बहुमत संपवले. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी या दोघांनी मिळून नरेंद्र मोदी-अमित शाहांना दाखवून दिले तुम्ही आम्हाला खरेदी करू शकत नाही असं त्यांनी म्हटलं.
तसेच आपण सगळे मुंबईकर आहोत, ना बटेंगे, ना कटेंगे, लढेंगे और भगायेंगे..कुणाला यायचं त्याला येऊ द्या, हा महाराष्ट्र आहे, मुंबई आहे ही तुमची जाहागिरी नाही. आम्ही सगळे आहोतच, जो संघर्ष उद्धव ठाकरे, शरद पवार करत आहेत त्यात अबु आझमी आमच्या खांद्याला खांदा लावून साथ देत आहेत. त्यामुळे अबु आझमींसोबत उभे राहणे हे माझे कर्तव्य आहे. महाराष्ट्र अदानीला विकण्याची पूर्ण तयारी झाली आहे पण आम्ही होऊ देणार नाही. ही मुंबई गौतम अदानी, नरेंद्र मोदी, अमित शाह यांना देणार नाही. धारावी, मुंबई एअरपोर्ट अदानीला दिले, मुंबईतील मिठाघरे, जकात, टोलनाके अदानींना मग आमच्याकडे काय उरले? असा सवाल करत संजय राऊतांनी महायुतीवर निशाणा साधला.
दरम्यान, मोदींचा कार्यक्रम फिक्स आहे. मोदी ब्राझीलहून इटलीला चाललेत. जनतेचे पैसे लुटले जातायेत. जनतेला भिकारी बनवून स्वत:मज्जा मारतायेत. २३ तारखेला राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येऊ द्या, पुढील ३ महिन्यात मोदी दिल्लीतून जातील. महाराष्ट्रात काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. नरेंद्र मोदी-अमित शाह महाराष्ट्रात हरतायेत. महाराष्ट्रात हरल्यानंतर मोदी ज्या कुबड्या घेऊन बसलेत, चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे पाठिंबा काढतील त्यानंतर मोदी सरकार जाईल असा दावाही संजय राऊतांनी केला आहे.
"राहुल-प्रियंका महाराष्ट्रात येताच मोदी-शाह गायब"
आम्हालाही ईडीने जेलमध्ये टाकले, आम्ही घाबरलो नाही. सरकार आल्यानंतर ज्या जेलमध्ये आम्ही होतो तिथे कुणाला पाठवायचे याची यादी आम्ही बनवून ठेवली आहे. 'सायकल' सध्या चर्चेत आहे. ना पेट्रोल, ना डिझेल महागाई सुरू आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी महाराष्ट्रात येताच नरेंद्र मोदी-अमित शाह गायब झाले. देवेंद्र फडणवीस यांचे डोके ठिकाणावर नाही. निवडणूक महाराष्ट्रात आहे, परंतु महाराष्ट्रात निवडणूक जिंकल्यानंतर पाकिस्तानात झेंडा फडकवू असं ते बोलत होते. तुमचा नागपूरचा झेंडा खाली उतरतोय. पाकिस्तान सोडा आधी मणिपूरमध्ये झेंडा फडकवा. लडाखमध्ये फडकवा. मोठमोठ्या बाता करतात, डरपोक लोक आहेत. समोर आले की रस्ता बदलतात असा टोलाही संजय राऊतांनी भाजपाला लगावला.