Maharashtra Assembly Election 2024 Sanjay Raut News: काँग्रेस पक्षाची केंद्रीय निवडणूक समितीची होणारी बैठक जागा वाटपाच्या निर्माण झालेल्या तिढ्यामुळे रद्द झाली. काँग्रेसचे जे नेते दिल्लीत पोहोचले आहेत, त्यांना दिल्लीतच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अन्य प्रमुख नेत्यांनाही दिल्लीत बोलावले आहे. या नेत्यांची पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या समवेत बैठक होणार आहे. जागावाटपावरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये बिघाडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यातच आता पुन्हा एकदा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य केले.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याची निवडणूक आहे. काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी हे दिल्लीत आहेत. तिथे त्यांच्या बैठका होत असतात. त्यामुळे काँग्रेस नेते तिथे थांबले असतील तर काही चुकीचे वाटत नाही. कोणताही एक विभाग असतो, तो एका पक्षाचा नसतो. एखाद्या भागावर एखाद्या पक्षाचा प्रभाव असू शकतो. कोकण- मुंबई, उत्तर महाराष्ट्रातील बऱ्याचशी भागात शिवसेनेचा प्रभाव आहे. विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस नगण्य आहे. त्यामुळे विदर्भातील जागावाटपासंदर्भात त्यांच्यात आणि आमच्यात मतभेद किंवा संघर्ष होण्याचा प्रश्न येत नाही. एखादी किंवा दुसरी जागा सोडली, तर काँग्रेस आणि आमच्यातही मतभेद नाहीत. एखाद्या जागेवर दोन पक्षांचे कार्यकर्ते दावा सांगतात. त्यातून मार्ग काढावा लागेल, असे संजय राऊत यांनी सांगितले.
भाजपाने पहिली यादी जाहीर करून तीर मारला का
भाजपाने पहिली यादी जाहीर करून तीर मारला का, असा खोचक सवाल करत ज्या जागांवर मतभेद नाही, तेथील उमेदवारांना असेल किंवा आमदारांना असेल, कामाला लागण्याचे आदेश मातोश्रीवरून उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. आम्ही शरद पवार यांना भेटलो, ते शिवसेना आणि राष्ट्रवादीतील काही मुद्दे होते, त्यावर चर्चा केली. शरद पवार सर्वांना तिथेच भेटतात. म्हणून आम्हीही तिथे गेलो होतो, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, विदर्भातील काही जागांवर वाटपाची चर्चा अडकली आहे. ज्या जागा काँग्रेस अनेक वर्ष जिंकत आली आहे, त्या जागा आम्हाला दिल्या पाहिजेत असा आग्रह ठाकरे गटाने आहे. झिशान सिद्दिकी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. ती जागा ठाकरे गटाला वरुण सरदेसाई यांच्यासाठी हवी आहे. कुलाबा, भायखळा या जागासाठी त्यांचा आग्रह आहे. संपूर्ण कोकण आम्ही ठाकरे गटासाठी दिला आहे. विदर्भात काँग्रेसची ताकद आहे. ज्या भागात ज्यांची ताकद आहे, त्या भागात त्यांनी उमेदवार उभे करावेत असे ठरलेले असतानाही, ठाकरे गटाकडून काही नेते विशिष्ट जागांसाठी आग्रह धरत आहेत. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ती बैठक सकारात्मक झाली असे त्यांनी माध्यमांना सांगितले होते. मात्र पुन्हा काँग्रेसच्या ठाकरे गटाच्या काही नेत्यांनी ठराविक जागेसाठी आग्रह धरला. काँग्रेसच्या नेत्यांची आपापसात चर्चा झाली आणि केंद्रीय निवडणूक समितीची बैठक रद्द करून बैठक घेण्याचे ठरले.