Maharashtra Assembly Election 2024 Sanjay Raut News: विदर्भ हा महाराष्ट्राचा भाग आहे, ते काय स्वतंत्र नाही. विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदारही जिंकले आहेत. शिवसेनेचे खासदार जिंकले आहेत. रामटेकसारखी सहा वेळेला निवडून आलेली जागा आम्ही काँग्रेसला दिली आहे. अमरावतीची आमची हक्काची जागा आम्ही काँग्रेसला दिली. त्या बदल्यात आम्ही विधानसभेला काही अपेक्षा ठेवल्या तर त्यात चुकीचे असे काही मला वाटत नाही, अशी स्पष्ट भूमिका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मांडली. ते पत्रकारांशी बोलत होते.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. आचारसंहिता लागू होताच राज्यातील राजकारणाला वेग आला आहे. महाविकास आघाडीची विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाची चर्चा पुन्हा सुरू झाली. आतापर्यंत एकूण २८८ जागांपैकी २६० जागांचे वाटप पूर्ण झाले असून, यातील १०० जागा काँग्रेसला, तर उद्धव सेना आणि शरद पवार गटाला प्रत्येकी ८० जागा देण्यावर आघाडीतील नेत्यांनी शिक्कामोर्तब केले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. उर्वरित २८ मित्र पक्षांसाठी सोडण्यात आल्या असून त्यावर दोन पक्षांनी दावा सांगितल्याने तो तिढा कायम असल्याचेही सांगण्यात आले. यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांवर तीव्र नाराजी व्यक्त करत आता राहुल गांधी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले.
जागावाटपाचा तिढा सोडवण्यास राज्यातील काँग्रेस नेते सक्षम नाहीत
मुकुल वासनिक, रमेश चेन्नीथला, केसी वेणूगोपाल यांच्याशी चर्चा झाली. राहुल गांधी यांच्याशी बोलणार आहे. तिढा असलेल्या जागांवर लवकर मार्ग काढावा, असे आम्ही म्हणत आहोत. राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये जास्त मतभेद नाहीत. काँग्रेसचे राज्यातील नेते तिढा असलेल्या जागावर मार्ग काढण्यास सक्षम दिसत नाहीत. ते म्हणतात की, हायकमांडशी चर्चा करावी लागेल. आता वेळ फार नाही. वेगाने चर्चा व्हावी. त्यामुळे आम्ही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितले आहे की, लवकर निर्णय घ्यावा आणि जागा वाटप जाहीर करावे, असे संजय राऊत यांनी ठामपणे म्हटले आहे.
दरम्यान, सांगोल्याचे दीपक आबा साळुंखे यांचा प्रवेश आहे. राजन तेली यांचा प्रवेश आहे. भविष्यात अजून काही महत्त्वाचे प्रवेश महाराष्ट्रातून होतील. सांगोल्याची जागा ही शिवसेनेची आहे. आमचे विद्यमान आमदार तिथे आहेत आणि जिंकलेली ती जागा आहे, असे संजय राऊत म्हणाले.