Join us

'त्या' महिला ठाकरे गटाच्या पदाधिकारी?; माहीम कोळीवाड्यातील प्रकारात वेगळाच ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 6:31 PM

सदा सरवणकरांच्या प्रचारात घडलेल्या एका प्रकारामुळे चांगलेच वातावरण तापले आहे. सरवणकरांना विरोध करणाऱ्या महिलांबाबत समाधान सरवणकरांनी गंभीर आरोप केलेत. 

मुंबई - माहीम मतदारसंघात आज महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर यांच्या प्रचार रॅलीत महिलांचा राग अनावर झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओनंतर आता सदा सरवणकरांचे चिरंजीव समाधान सरवणकर यांनी संबंधित महिलांवर गंभीर आरोप लावले आहेत. या महिला उबाठाच्या पदाधिकारी असून फूड स्टॉलच्या मागे त्या दारूची भट्टी चालवायच्या असा आरोप समाधान यांनी केला. त्यावर या महिलांनीही सरवणकरांविरोधात पोलीस तक्रार दिली आहे. तुमच्याकडे पुरावे असतील तर द्या, खोटी बदनामी केल्याबाबत मानहानी दाखल करणार असा इशारा दोन्ही बहि‍णींनी दिला. 

समाधान सरवणकर म्हणाले की, नाईक नावाच्या महिलेने माहिममध्ये या महिलेने दारूचा धंदा सुरू केला होता. फूड प्लाझाच्या पाठीमागे दारूची विक्री व्हायची. ते व्हिडिओ मी पाठवले आहेत. या महिलेबाबत तिथल्या स्थानिक महिलांनी तक्रार केली. त्यानंतर हा दारूचा धंदा बंद झाला. त्यामुळे हा राग तिने आजच्या प्रचार रॅलीत काढला. दारूच्या धंद्याला आम्ही कुणीही समर्थन करणार नाही. येणाऱ्या काळात दारुची भट्टी सुरू राहू देणार नाही. या २ बहिणी माहिममध्ये हफ्ते घेण्याचं काम करतात. या महिला उबाठाच्या पदाधिकारी आहेत. आज जे काही राजकारण त्यांनी केले परंतु कितीही काही केले तरी माहिममध्ये आम्ही दारूची भट्टी सुरू करायला देणार नाही यावर आम्ही ठाम आहोत असं त्यांनी सांगितले.

तर व्हिडिओ आम्ही व्हायरल केला नाही. मी जे काही बोलते ते रेकॉर्डिंग हवं  म्हणून मी मुलीला व्हिडिओ शूट करायला सांगितला. सदा सरवणकर विद्यमान आमदार आहेत आम्ही त्यांनाच प्रश्न विचारणार, आमचा सी फूड प्लाझा जो स्टॉल होता ते ५ महिने झाले बंद पडलेत. आम्हाला कायमस्वरुपी स्टॉल दिले होते. का बंद पाडलं हा जाब आम्ही विचारणार ना...ते उत्तर द्यायला तयार नव्हते ते निघून गेले. सदा सरवणकरांनी माझ्या बहिणीवर आरोप केलेत. या प्रकारानंतर माझा मुलगा अमेरिकेत आहे, त्याला साहिल नावाच्या मुलाचा फोन आला, तू इथं नाहीस तुझ्या बापाला बघून घेईन. तुझ्या बापाला मारणार. सदा सरवणकर, मिलिंद तांडेल आणि त्याचे २ भाऊ साहिल आणि ऋतिक यांनी ही धमकी दिली आहे. फोनचे स्क्रिनशॉट्स आम्ही पोलिसांना दिले आहे. आम्ही सामान्य माणसे, माझा नवरा कामावर जातो, रात्री ड्युटीवर येतात, त्यामुळे त्यांना काही झाले तर म्हणून ही तक्रार दिली आहे असं मंगला तांडेल यांनी म्हटलं 

दरम्यान, आम्ही कुठल्याही गुंडशाही नाही, माझं नाव शर्मिला असलं तरी शमा म्हणून ओळखली जाते. मी सदा सरवणकरांसोबत काम करायची. या परिसरात माझी चांगली प्रतिमा आहे. परंतु आज माझी बदनामी करण्यात आली. मिलिंद तांडेल यांच्या भावाने फोन करून धमकावलं. याबाबत आम्ही पोलिसांकडे तक्रार केली आहे. उद्या आमच्या जीवाला आणि कुटुंबाला त्रास झाला तर त्याची जबाबदारी सदा सरवणकर, समाधान सरवणकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची असेल. मुख्यमंत्री जर भेटणार असतील तर खरेच आम्ही भेटू. आज हक्कासाठी आम्ही बोललो त्याचे हे फळ मिळत असेल तर लोक मतदानही करत नाही. प्रत्येक जण जीवाला घाबरतो. आम्ही दीपक केसरकर यांनाही तक्रार दिली होती असं या दोन्ही महिलांनी सांगितले. 

मी १२ वर्ष सरवणकरांसोबत काम केलंय... 

मी दारूचा अवैध धंदा चालवते असा आरोप माझ्यावर करण्यात आला. माझा नवरा प्रेसमध्ये कामाला असताना मी अशाप्रकारे धंदा चालवणार का? माझ्या घरात नवरा सुपारीही खात नाही आणि मी दारूचा धंदा चालवते असा आरोप करतात. मी मानहानीचा दावा करणार आहे. हा आरोप आम्ही चालवून देणार नाही. मी गुन्हा केलाच नाही, पुरावा द्या. बचत गटाचे स्टॉल होते. जेवण दिले जायचे. कोळी संस्कृती लोकांपर्यंत पोहचावी यासाठी ते स्टॉल लावले होते. त्याचे उद्घाटन दीपक केसरकरांनीच २ नोव्हेंबर २०२३ मध्ये केले होते. ६ महिने चांगला उद्योग सुरू होता. अचानक सी फूड स्टॉल बंद पाडला. आज त्याबाबत जाब विचारला म्हणून नाहक बदनामी करणार ते आम्ही खपवून घेणार नाही. आम्हाला पुरावे द्या. मी २० वर्ष राजकारणात आहे. मी उद्धव ठाकरेंसोबत होते, सदा सरवणकर यांच्याशी घरचे संबंध होते. मी त्यांना दादा बोलायची. १२ वर्ष त्यांच्यासोबत काम केले. जेव्हा यांचे मनसुबे कळले तेव्हा मी ६ महिन्यापूर्वी बाहेर पडले. राजकारणातून माझी बदनामी व्हावी यासाठी आरोप करतायेत हे सांगत शर्मिला नाईक या महिलेने समाधान सरवणकरांनी लावलेले आरोप फेटाळले. 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४माहीममुंबई विधानसभा निवडणूकसदा सरवणकरउद्धव ठाकरेअमित ठाकरे