Join us

"मनात पक्कं केलंय, अशा लोकांविरोधात..."; शायना एनसी यांची अरविंद सावंतांवर खरमरीत टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2024 12:18 PM

Shaina NC Arvind Sawant, Maharashtra Election 2024: अरविंद सावंत शायना एनसी यांना 'इम्पोर्टेड माल' म्हणाल्याने पेटला नवा वाद

Shaina NC Reaction on Arvind Sawant Controversial statement: विधानसभा निवडणुकीत मुंबादेवी मतदारसंघातून (Mumbadevi Vidhan Sabha) शिंदेसेनेच्या उमेदवार शायना एनसी यांना तिकीट मिळाले आहे. त्या गेली २० वर्षे भाजपामध्ये होत्या. पण या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नुकताच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. शायना एनसी यांच्याविरोधात प्रचार करत असताना उद्धवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी त्यांचा उल्लेख ‘इम्पोर्टेड माल’ (Imported Maal) असा केला. त्या मुद्द्याने आता वातावरण चांगलेच तापले असून शायना यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. नागपाडा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम ७९ आणि ३५६(२) अन्वये गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. याचबाबत शायना एनसी यांनी आज प्रतिक्रिया दिली. (Maharashtra Assembly Election 2024)

"अरविंद सावंत यांनी जे विधान केले आहे, त्याविरोधात नागपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. महिलेबाबत अपमानजनक वक्तव्य केल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे. महिलांच्या सन्मानासाठी हा एक लढा आहे. अरविंद सावंत जेव्हा मला 'इम्पोर्टेड माल' म्हणाले तेव्हा शेजारी बसलेले मुंबादेवीचे आमदार अमीन पटेल देखील हसत होते. जेव्हा कामाच्या आधारावर चर्चा करायचे आव्हान असते तेव्हा विरोधक पळ काढतात. पण व्यक्तिगत टिप्पणी किंवा महिलांविषयी वाईट विधान करणे मात्र यांच्या सवयीचे झाले आहे. यांच्या वागण्यातून विकृत मानसिकता आणि मनस्थिती पाहायला मिळते. मी आता मनात पक्कं केलंय की लढा द्यायचा," असा निर्धार शायना एनसी यांनी व्यक्त केला.

"एकीकडे राज्यातील सरकार लाडकी बहिण योजनेसारख्या गोष्टींतून महिलांना सशक्त आणि सबल करत आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशभरात महिलांसाठी विविध योजना सुरु आहेत. देशाच्या राष्ट्रपती या एक महिला आहेत. पण दुसरीकडे हे लोक अशा अभद्र टिप्पणी करताना दिसतात. आता ते विरोधी पक्षातील नेते यावर काहीच का बोलत नाहीत? मी माझ्या २० वर्षांच्या कारकिर्दीत महिलांच्या पाठिशी उभी राहिले आहे. अशा वेळी मी पक्षीय राजकारण कधीही मध्ये येऊ दिले नाही. पण आज मात्र महाविनाश आघाडीचे नेते गप्प आहेत," अशी सणसणीत टीका त्यांनी केली.

"मविआचे नेतेमंडळी जरी गप्प असतील तरी ही जनता सारं काही पाहतेय. आई मुंबादेवीच्या आशीर्वादाने येथील सर्व महिला माझ्या पाठिशी उभ्या राहतील," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४अरविंद सावंतमुंबादेवीशिवसेनामुंबई विधानसभा निवडणूक