मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 11:22 AM2024-11-16T11:22:44+5:302024-11-16T11:25:29+5:30

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघात सगळ्यांचे लक्ष लागले आहे. याठिकाणी आदित्य ठाकरे यांच्यासमोर मनसे आणि शिंदेसेनेने आव्हान निर्माण केले आहे. 

Maharashtra Assembly Election 2024 - Shiv Sena Uddhav Thackeray Party Workers wife tears in her eyes after seeing MNS candidate Sandeep Deshpande in Worli | मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?

मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?

मुंबई - विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. अनेक उमेदवार दारोदारी जात लोकांच्या गाठीभेट घेत आहेत. मुंबईतील वरळी मतदारसंघात यंदा तिरंगी लढत आहे. याठिकाणी आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यांना मनसेकडून संदीप देशपांडे आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांचे आव्हान आहे. त्यात संदीप देशपांडे वरळीच्या गोपाळ नगर भागात प्रचाराला गेले असताना त्याठिकाणी एका कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीच्या भावना अनावर झाल्याचे दिसून आले. 

गोपाळ नगर भागात शिवसेनेचे उपशाखाप्रमुख म्हणून कार्यरत असणाऱ्या वसंत कांबळे यांचं २०१९ साली अपघाती निधन झालं. कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची परिसरात ओळख होती. मात्र त्यांच्या निधनानंतर कुटुंब एकाकी पडले. वसंत कांबळे यांच्या पत्नी सुनंदा कांबळे यांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळली. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे हे गोपाळ नगर भागात प्रचारासाठी पोहचले असताना सुनंदा कांबळे यांच्या भावना उफाळून आल्या. त्यावेळी त्या म्हणाल्या की, शिवसेनेसाठी माझ्या नवऱ्यानं जीव दिला. आदित्य ठाकरे निवडणुकीत उभे होते. त्याआधी माझ्या नवऱ्याचा मृत्यू झाला. आदित्य जिंकला. मात्र कुणीही माझ्याकडे बघायला आलं नाही. पतीच्या निधनानंतर शोकसभा घेतली, त्यात सगळे नेते आले, तेव्हा आम्ही तुमच्या मागे आहोत असं बोलले, पण लॉकडाऊनमध्ये कुणीही विचारायला आलं नाही. कुणीच आलं नाही. आता मनसेशिवाय कुणाला मत द्यायचं नाही हे मी ठरवलंय असं ही महिला व्हिडिओ बोलताना दिसते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

तर माझ्या जन्माच्या आधीपासून माझे वडील शिवसेनेसाठी काम करतायेत. ते बाळासाहेब ठाकरे यांना खूप मानत होते. आम्ही आजतागायत शिवसेनेशिवाय कुणाकडेही पाहिले नाही. माझ्या वडिलांनी पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभाग घेतला. ९० च्या दशकात गोपाळ नगर येथील पडीक जागेवर जिथे लोक कचरा टाकत होते, तेथील जागा स्वच्छ करून तिथे चहाचा स्टॉल टाकला. आमच्या विभागात नगरसेवक, महापौर, आमदार शिवसेनेचे होते, त्यांच्याकडे वडिलांनी कायम पालिकेचा परवाना मिळवण्यासाठी धडपड केली. मात्र नेत्यांकडून फक्त आश्वासन दिले जात होते. माझ्या वडिलांच्या निधनानंतर शोकसभा घेतली, त्यातही तुमच्या कुटुंबाच्या मागे आम्ही आहोत असं नेत्यांनी सांगितले. परंतु कुणीही विचारलं नाही. लॉकडाऊनमध्येही कुणी विचारपूस करायला आले नाही अशी खंत वसंत कांबळे यांचा मुलगा भूपेश कांबळे यांनी व्यक्त केली. 

वरळीत तिरंगी लढत

वरळी मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी बाजी मारली होती. मात्र त्यावेळी आदित्य यांच्यासमोर कुणाचेही आव्हान नव्हते. मनसेने इथं उमेदवार दिला नव्हता. त्याशिवाय माजी आमदार सचिन अहिर यांनीही राष्ट्रवादीचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला होता. सध्या वरळीत ३ आमदार आहेत. त्यातील आदित्य ठाकरे विधानसभेचे तर सचिन अहिर, सुनिल शिंदे हे विधान परिषदेवर आमदार आहे. त्याशिवाय खासदार, माजी महापौर हेदेखील वरळी भागात आहेत. त्यामुळे शिवसेनेचा हा गड मानला जातो. परंतु यंदाच्या निवडणुकीत मनसेने या मतदारसंघात संदीप देशपांडे यांना उतरवलं आहे. तर शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदेसेनेकडून या मतदारसंघात मिलिंद देवरा यांना उमेदवारी मिळाली आहे त्यामुळे यंदा वरळीत तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 - Shiv Sena Uddhav Thackeray Party Workers wife tears in her eyes after seeing MNS candidate Sandeep Deshpande in Worli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.