Join us

शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 1:28 PM

शिवडी विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटातील वाद अखेर मिटल्याचे समोर आलं आहे.

Shivdi Assembly Constituency : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवडी विधानसभा मतदारसंघात सुरु झालेलं नाराजीनाट्य आता संपलेले आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून विद्यमान आमदार अजय चौधरी यांना संधी दिल्यानंतर इच्छुक असलेले शिवडी विधानसभा संघटक सुधीर साळवी हे नाराज झाल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यांच्या समर्थकांनीही सुधीर साळवी यांनाच उमेदवारी मिळायला हवी अशी भूमिका घेतली होती. मात्र सुधीर साळवी यांना मातोश्रीवर बोलवून घेण्यात आल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली. त्यानंतर आता सुधीर साळवी यांनी अजय चौधरींची भेट घेतली आहे. त्यामुळे आता सुधीर साळवी यांचे नाराजी दूर झाल्याचे म्हटलं जात आहे.

शिवडीतील नाराजी नाट्यानंतर आता अजय चौधरी आणि सुधीर साळवी एकत्र आले आहेत. अजय चौधरी हे सोमवारी आपला निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. त्याआधी अजय चौधरी यांच्या राहत्या घरी सुधीर साळवी यांनी जाऊन भेट घेतली आहे. यासोबत दोघांनी चर्चाही केली आहे. अजय चौधरी यांनीच या भेटीचे फोटो त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन पोस्ट केले आहेत. आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दक्षिण मुंबई लोकसभा समन्वयक आणि शिवडी विधानसभा संघटक सुधीर साळवी ह्यांची सदिच्छा भेट झाली,अशा कॅप्शनसह अजय चौधरी यांनी दोन फोटो शेअर केले आहेत.

सुधीर साळवी यांना उमेदवारी न मिळाल्याने शिवडी विधानसभा मतदारसंघामध्ये खासकरुन लालबागमध्ये कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी होती. अजय चौधरी यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लालबागमधील कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत घोषणाबाजी देखील केली होती. त्यानंतर सुधीर साळवी यांनी आपल्या कार्यकर्त्यांची समजूत काढली होती. आपल्याला शिवडी मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचा उमेदवार निवडून आणायचा आहे आणि त्यासाठी आपण एकत्र येवूया असे आवाहन सुधीर साळवी यांनी केले होते. त्यानंतर आता प्रचाराची रणनिती ठरवण्यासाठी आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यासंदर्भातील तयारीसाठी सुधीर साळवी आणि अजय चौधरी यांची भेट झाली आहे.

‘तुमच्या प्रत्येकाच्या मनातला आमदार हा सुधीर साळवी’

"मी शिवसेनेत अनेक वर्ष काम केलेलं आहे. मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या विचाराने काम केलं आहे. मी आयु्ष्यात कधी राजकारण केलं नाही. मी यावेळी शिवसेनेची उमेदवारी मागितली होती त्यानंतर ज्या पद्धतीने प्रवास पुढे गेला, त्या प्रवासात तुम्ही सगळ्यांनी मला जी साथ दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांना दंडवत घालतो. शिवसेना पक्षप्रमुखांचा बालेकिल्ला आणि यावरचा भगवा अबाधित ठेवण्यासाठी आपण कष्ट केले. खूप काही भोगलं आहे. मला माहिती आहे की, मला उमेदवारी न मिळाल्याने तुम्हालाही त्रास झालेला आहे. पण मी आज तुम्हाला सांगतो की, तुमच्या प्रत्येकाच्या मनातला आमदार हा सुधीर साळवी आहे. मला पक्षप्रमुखांनी शब्द दिला आहे की, सुधीर तुला नाउमेद करणार नाही. मला उद्धव ठाकरे यांनी शब्द दिला आहे की, संघटना तुझी योग्य ती दखल घेईल. माझा पक्षप्रमुखांवर विश्वास आहे," असं सुधीर साळवी यांनी म्हटलं. 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४मुंबई विधानसभा निवडणूकशिवडीअजय चौधरी