"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 08:46 PM2024-11-12T20:46:03+5:302024-11-12T20:48:16+5:30
घाटकोपरमध्ये बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं.
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुंबईत आले आहेत. राज्यभरात अमित शाह यांनी सभांचा धडाका लावला असून त्यांनी आज अनेक भागांचा दौरा केला. मुंबईत संध्याकाळी घाटकोपर येथे झालेल्या प्रचारसभेत अमित शाह यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार निशाणा साधला. कलम ३७० हटवण्यावरूनही अमित शाह यांना उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं.
घाटकोपरमध्ये मंगळवारी अमित शाह यांनी राम कदम, पराग शाह, मिहीर कोटेचा, सुवर्णा करंजे, सुरेश पाटील, अशोक पाटील या महायुतीच्या उमेदवारांसाठी मोठी प्रचारसभा घेतली. यावेळी कलम ३७० च्या मुद्द्यावरुन अमित शाह यांनी काँग्रेस, शरद पवार गट आणि ठाकरे गटावर जोरदार टीका केली. यावेळी बोलताना भारतीय जनता पक्षासाठी काश्मीर हा आम्हालला सत्तेपेक्षाही प्रिय मुद्दा असल्याचे अमित शाह यांनी म्हटलं.
"संसदेत जेव्हा मी कलम ३७० हटवण्यासाठी विधेयक घेऊन उभा होतो तेव्हा राहुल गांधी शरद पवारांचा पक्ष ममता बॅनर्जींचा पक्ष आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना ओरडत होते. ते म्हणाले की ३७० हटवू नका. मी का असं विचारलं. त्यावर ते म्हणाले की जर ३७० हटवलं तर देशात रक्ताच्या नद्या वाहतील. राहुल गांधींनी लक्षात ठेवावं कलम ३७० हटवून सहा वर्षे झाली रक्ताच्या नद्या सोडा कोणाची दगड फेकण्याची हिंमत नाही. पंतप्रधान मोदींनी देशाला आतंकवाद दहशतवाद आणि नक्षलवादापासून मुक्त केले आहे, असं अमित शाह म्हणाले.
"काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाने प्रस्ताव ठेवला की कलम ३७० पुन्हा लागू केले पाहिजे सगळ्यात आधी मला उद्धव ठाकरे यांना विचारायचं आहे. उद्धवजी महाराष्ट्राच्या जनतेसमोर सांगा की कलम ३७० पुन्हा आणायचं आहे की नाही. जाऊद्या उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले आहेत. त्यांच्या उत्तराची अपेक्षा ठेवू नका पण मी सांगून जातो राहुल गांधी तुमची चौथी पिढी जरी आली तरी कलम ३७० पुन्हा लागू होणार नाही. भारतीय जनता पक्षासाठी जम्मू काश्मीर हा आमच्या सत्तेपेक्षाही प्रिय मुद्दा आहे. काश्मीर मधून दहशतवाद संपवण्याचे काम आमच्या पंतप्रधान मोदींनी केले आहे," असेही अमित शाहांनी म्हटलं.
"राहुल गांधी, सुप्रिया सुळे, संजय राऊत हे सगळेजण वक्फ कायद्याच्या बदलाच्या विरोध करत आहेत. मी सांगून जात आहे त्यांना विरोध करायचा तर करू द्या. नरेंद्र मोदी सरकार वक्फ कायद्यात नक्कीच बदल करणार आहे. हा आझाद भारत आहे," असंही अमित शाह म्हणाले.