मुंबई - माहिम मतदारसंघात यंदा विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना शिंदे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे तर याच मतदारसंघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. उद्धव ठाकरे गटाकडूनही अमित ठाकरेंविरोधात महेश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघाची लढत चांगलीच रंगणार आहे. त्यात आमदार सदा सरवणकर यांनी ट्विट करून मोठं विधान केले आहे.
सदा सरवणकर म्हणाले की, मी चाळीस वर्षापासून शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. आम्ही आमच्या कष्टाने आणि घामाने तीन वेळा माहिमचा आमदार झालो. बाळासाहेब असते तर त्यांनी मला आपल्या नातेवाईकांसाठी सीट सोडायला सांगितलं नसतं. त्यांचे पन्नास नातेवाईक दादर - माहिममध्ये राहतात पण उमेदवारी त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दिली. ते कार्यकर्त्याची भावना जपणारे नेते होते असं त्यांनी सांगितले.
त्याशिवाय एकनाथ शिंदे साहेबांकडे पाहा, त्यांचे सुपुत्र हे तीन वेळचे खासदार असताना सुद्धा त्यांनी आपल्या मुलाला केंद्रात मंत्री बनवले नाही तर एका निष्ठावंत शिवसैनिकाला ती संधी दिली. राजसाहेबांना मी विनंती करतो माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर अन्याय करू नका. मला आपले समर्थन द्या अशी मागणी सदा सरवणकर यांनी राज ठाकरेंकडे केली आहे.
सदा सरवणकर काय म्हणाले?
राज ठाकरे हे प्रचंड मोठे नेते आहेत. मला त्यांच्याबद्दल आदर, गेली ३० वर्ष मी या मतदारसंघात रात्रदिवस काम करतोय. मतदारांसोबत जिव्हाळ्याचे नाते आहे. माझे हे नाते तोडू नका. सर्वसामान्य शिवसैनिकाला राजसाहेबांनी आशीर्वाद द्यावेत अशी मी विनंती करतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही वाटत होते, खेळीमेळीच्या वातावरणात हे व्हावे. परंतु मतदारांचा आग्रह आहे, शिवसैनिकाने निवडणूक लढवली पाहिजे त्यामुळे मला निवडणुकीतून माघार घेणे मला अवघड होतंय असं सरवणकरांनी म्हटलं.
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा
माहिम मतदारसंघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच रिंगणात उतरले आहेत. या जागेवर शिंदे गटाकडून सदा सरवणकर यांना तिकिट देण्यात आले आहे. त्यात माहिम जागेवरून देवेंद्र फडणवीसांनी मोठं विधान केले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे माहिम मतदारसंघात अमित ठाकरेंना पाठिंबा द्यावा असं भाजपाचं मत आहे. मुख्यमंत्री शिंदेंचीही तीच इच्छा आहे. मात्र तिथले उमेदवार ऐकण्यास तयार नाहीत असं विधान करत देवेंद्र फडणवीसांनी अमित ठाकरेंच्या पाठिंब्यावर मोठं विधान केले आहे.