- महेश पवारमुंबई : मुंबईतील ३६ पैकी १० मतदारसंघांत महायुती आणि मविआच्या उमेदवारांसमोर अपक्ष उमेदवारांचे आव्हान असणार आहे. त्यासोबतच वंचितचे २३ आणि बहुजन समाज पक्षाचे २४ उमेदवारही रिंगणात असल्याने उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे.
काँग्रेस, उद्धवसेना, शरद पवार गट आणि समाजवादी पार्टी या मविआमधील पक्षांच्या अधिकृत उमेदवारांविरोधात चार ठिकाणी बंडखोरी झाली आहे. भायखळामध्ये उद्धवसेनेचे उमेदवार मनोज जामसूतकर आणि काँग्रेसचे माजी आमदार मधुकर चव्हाण यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. वर्सोवामध्ये उद्धवसेनेच्या हारूण खान यांना उमेदवारी मिळाल्याने माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे; तर, मुलुंडमध्ये शरद पवार गटाच्या संगीता वाजे आणि काँग्रेसकडून राकेश शेट्टी यांचे अर्ज आले आहेत.
कुर्ला येथे उद्धवसेनेच्या प्रवीणा मोरजकर आणि शरद पवार गटाचे मिलिंद कांबळे यांनी अर्ज भरले आहेत. याच मतदारसंघात बसपच्या मिलिंद कांबळे यांचाही अर्ज आला आहे. त्यामुळे कोणते कांबळे रिंगणात असतील याची चर्चा होत आहे. भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार गट या महायुतीच्या पक्षांमध्येही काही आलबेल नाही. शिवडीमध्ये महायुतीने उमेदवारच दिला नाही. त्यामुळे येथून भाजप नेते नाना आंबोले यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. आमदार अजय चौधरी आणि मनसेचे बाळा नांदगावकर यांच्याशी त्यांची लढत होण्याची शक्यता आहे. अणुशक्तीनगरमध्ये आमदार नवाब मलिक यांची मुलगी सना खान यांना अजित पवार गटाने उमेदवारी दिली आहे; तर, शिंदेसेनेचे अविनाश राणे यांनीही येथून अर्ज भरला आहे.
बोरिवलीत काय होणार? भाजपने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिल्यामुळे माजी खासदार गोपाळ शेट्टी नाराज झाले. त्यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज भरत कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही, असा इशारा दिला आहे. त्यामुळे येथे उपाध्याय आणि शेट्टी यांच्यातच प्रमुख लढत होण्याची शक्यता आहे.
निकाळजेही रिंगणातआठवले गटाने महायुतीकडे मुंबईत दोन जागांची मागणी केली होती. मात्र, त्यांना एकही जागा देण्यात आलेली नाही. त्यामुळे आठवले गटाचे दीपक निकाळजे यांनीही चेंबूरमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. येथे उद्धवसेनेने आ. प्रकाश फातर्पेकर यांना पुन्हा संधी दिली आहे; तर, शिंदेसेनेने माजी आमदार तुकाराम काते यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे निकाळजे उमेदवारी कायम ठेवणार की अर्ज मागे घेऊन काते यांचा प्रचार करणार, याची चर्चा आहे.