Maharashtra Assembly Election 2024 : जागा वाटपाच्या बैठकीत होणाऱ्या चर्चांना पाय फुटतात, तेव्हा प्रत्येक जण आपापल्या परीने ती चर्चा रंगवून सांगू लागतो. जणू काही तोच आत मध्ये बसला होता अशा आविर्भावात अनेक जण बाहेर माहिती देतात. बाहेर येणाऱ्या अशा सगळ्या माहितीचा निचोड काढला, तर लांबत गेलेले चर्चेचे गुऱ्हाळ आणि नेत्यांचा अहंपणा, हटवादीपणा या विधानसभा निवडणुकीत आघाडीच्या मुळावर येणार हे निश्चित. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात समन्वयक म्हणून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे चर्चेला गेले. त्यानंतर सगळे नेते पुन्हा चर्चेला बसले.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विदर्भातल्या १५ जागांपैकी कोणत्या जागांवर नव्याने विचार करायचा, असा सवाल करत यादी संजय राऊत यांना दिली. तेव्हा राऊत यांनी काही वेळ यादी पाहिली आणि या तर आमच्याच जागा आहेत. यावर कसली चर्चा करायची? असे सांगत विषयच बंद केला. बैठकीतून मार्ग निघत नाही, हे पाहून बाहेर पडलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना अन्य नेत्यांनी जबरदस्तीने आत आणत चर्चेला बसवले. उद्धवसेनेचे नेते खा. अनिल देसाई सामोपचाराची भाषा करत असताना त्यांनाही खा. राऊत यांनी फटकारले. ही माहिती बाहेर आली. खरेखोटे माहिती नाही, पण अशा पद्धतीने चर्चा होणार असेल तर कोणत्या जागा कोणी लढवायच्या, यावर मविआचे कधीच एकमत होणार नाही.
मुंबईतल्या काही जागा जर चर्चा न करता, तुम्ही परस्पर एबी फॉर्म देणार असाल तर या जागा आपण मैत्रीपूर्ण पद्धतीने लढू, असा निरोप काँग्रेसकडून उद्धवसेनेला गेल्यानंतर पुन्हा चर्चेचे दरवाजे उघडणे हे शहाणपणाचे लक्षण नाही. जागा वाटपाचा निर्णय सामंजस्याने, तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र बसून घेतला असता, आठ दिवसांपूर्वीच चित्र स्पष्ट केले असते तर उमेदवारांना प्रचार करायला वेळ मिळाला असता. सुरू असलेल्या खेचाखेचीमुळे निर्माण होणारी कटूताही टाळता आली असती. महायुतीचे सर्व्हे त्यांना सुरुवातीच्या काळात दिलासादायक नव्हते हे खरे, पण महाविकास आघाडीने आपले सर्व्हे चांगले आहेत, म्हणून जागा वाटपात जे टोक गाठून स्वतःची अडचण करून घेतली आहे.
महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेतली. त्यात संजय राऊत आणि नाना पटोले यांच्या देहबोलीची छायाचित्रे प्रसिद्ध झाली, ती नक्कीच आशादायी नव्हती. उद्धवसेनेने परस्पर उमेदवार जाहीर केले. त्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अस्वस्थ आहेत. मात्र, तुला उमेदवारी मिळवून देतो, असे सांगून सेनेतल्या काही ज्येष्ठ नेत्यांनी कोणकोणते प्रताप केले, याच्या सुरस कथा मार्केटमध्ये चर्चेला उपलब्ध आहेत. त्या कथा कसोटीच्या क्षणी उद्धवसेनेलाही अडचणीत आणणाऱ्या आहेत.
काँग्रेसचे नेते दिल्लीत गेले असताना विदर्भातले एक नेते आणि उद्धवसेनेतील एक तापट नेते यांच्यात फोनवरून झालेला संवाद सर्वश्रुत झाला आहे. विदर्भातली एक जागा घेण्यासाठी तुम्ही जे काही केले, त्यापेक्षा जास्त मी करून देतो, पण ती जागा सोडा अशा पद्धतीची भाषा वापरली गेली. अशी कटूता मनात ठेवून निवडणुकीच्या प्रचाराला एकत्रपणे सामोरे तरी कसे जाणार..? आम्ही सगळे बरोबरीत आहोत, असे दाखवण्याचा अट्टाहास उद्धव सेनेला आणि पर्यायाने काँग्रेसलाही अडचणीत आणणारा ठरू शकतो. जिथे काँग्रेसची ताकद आहे, तिथे काँग्रेसला उमेदवार दिले पाहिजेत.
शरद पवार यांनी कुठलाही समानतेचा आग्रह न धरता उमेदवार देणे सुरू केले आहे. दुसरीकडे काँग्रेसने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये एकही उमेदवार घेतला नाही. पालघरमध्ये वसईची जागा सोडली, तर काँग्रेसकडे जागा नाही. मुंबईत ३६ पैकी किमान १३ जागा काँग्रेसला मिळणे अपेक्षित होते. तेही झाले नाही. वर्षा गायकवाड यांनी स्वतःची बहीण डॉ. ज्योती गायकवाड यांच्यासाठी आग्रह धरला, पण वर्सोवाची जागा सुरेश शेट्टी यांना मिळावी, म्हणून तो धरला नाही. मुकुल वासनिक यांनी शेट्टी यांच्यासाठी धरलेला आग्रह मुंबई काँग्रेसने ऐकला नाही.
काँग्रेसमध्येही जागा वाटपात एकवाक्यता नाही. सायन कोळीवाडामध्ये भाजपचे तमिळ सेलवन यांच्या विरोधात काँग्रेसचे दिवंगत नेते जगन्नाथ शेट्टी यांचे पुत्र अमित शेट्टी आणि रवी राजा उत्सुक होते. त्यांना डावलून गेल्या वेळी ३० ते ३५ हजारांनी पराभूत झालेल्या गणेश यादव यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. नेत्यांच्या मागे फिरणाऱ्यांना उमेदवारी दिली, तर जागा कशी जिंकणार? असा सवाल आता काँग्रेसमधून उपस्थित होत आहे. ऐरोली विधानसभेत काँग्रेसचे रमाकांत म्हात्रे यांचा मुलगा अनिकेत म्हात्रे भाजपचे गणेश नाईक यांच्याशी तुल्यबळ लढत देऊ शकला असता. मात्र, ती जागा उद्धवसेनेने घेऊन टाकली.
ठाण्यातही फार वेगळे चित्र नाही. भाजपच्या संजय केळकर यांच्याविरुद्ध उभे राहण्यासाठी शिंदेसेनेचे संजय भोईर आणि मीनाक्षी शिंदे ठाम आहेत. डोंबिवलीतून सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात उद्धवसेनेचे दीपेश म्हात्रे मैदानात आहेत. म्हात्रे यांनी शिंदेसेनेला रामराम ठोकून उद्धवसेनेत प्रवेश केला. त्यांना उमेदवारी दिल्यामुळे उद्धवसेनेतील निष्ठावंत सदानंद थरवळ यांनी राजीनामा दिला आहे. नाराजांची भली मोठी यादी आहे. प्रत्येक मतदारसंघात थोड्याबहुत फरकाने हेच चित्र आहे. अशा स्थितीत राज्यभर फिरून उमेदवारांची नाराजी दूर करायची कधी? आणि प्रचाराला लागायचे कधी? हा प्रश्न सर्वच पक्षात आहे.
महायुतीतही फारसे आलबेल नाही. भाजप, शिंदेसेनेचे उमेदवार ठरत नाहीत. मुंबई, कोकणात अजित पवार गटाला फार जागा मिळालेल्या नाहीत. देव आला द्यायला, पदर नाही घ्यायला... अशी मराठीत म्हण आहे. याची प्रचीती थोड्याबहुत फरकाने सर्वच पक्षांना आता येत आहे. लाडकी बहीण योजना जाहीर करणाऱ्या सरकारच्या शिंदेगटाचे भरत गोगावले, भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पक्षाचे नेते महिलांविषयी ज्या पद्धतीची विधाने करत आहेत, ते पाहता, भाजप शिंदेसेनेलाही हीच म्हण आठवत असेल... घोडा मैदान जवळच आहे...