Join us

‘बांद्रा बॉय’ची प्रतिष्ठा यंदा पणाला लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2024 8:06 AM

Maharashtra Assembly Election 2024: वांद्रे पश्चिम हा अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो. भाजपचे मुंबई अध्यक्ष ॲड. आशिष शेलार हे या मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.

- सुरेश ठमके मुंबई - वांद्रे पश्चिम हा अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो. भाजपचे मुंबई अध्यक्ष ॲड. आशिष शेलार हे या मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ भाजपने गेल्या दोन निवडणुकांमध्ये आपल्याकडे राखण्यात यश मिळवले आहे. आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मुंबई अध्यक्ष म्हणून मोठे यश मिळवून दिले होते. बीसीसीआयचे कोषाध्यक्ष असलेल्या आशिष शेलार यांच्यासाठी ही महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची निवडणूक मानली जात आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपचे उमेदवार ॲड. उज्ज्वल निकम यांना काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्याकडून पराभवाची धूळ चाखावी लागली होती. या पार्श्वभूमीवर शेलार यांच्यासाठी हा अत्यंत प्रतिष्ठेचा मुद्दा बनला असून, त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी काँग्रेसचे आसिफ झकेरिया यांचे त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे. याशिवाय बसप, आझाद समाज पार्टी यांच्यासह अन्य १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.

मतदारसंघातील कळीचे मुद्दे? - या मतदारसंघात झोपडपट्ट्यांच्या रखडलेल्या पुनर्वसन प्रकल्पांसह पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर आहे. - वाहतूककोंडी, तसेच बेकायदा बांधकामे आणि अनधिकृत फेरीवाल्यांची समस्या नागरिकांना सतावत आहे.  याशिवाय उच्चभ्रू वस्तीमध्ये हा मतदारसंघ असल्याने रेस्टॉरंट, पब संस्कृती यांचा होणारा उपद्रव आणि रात्री होणारी शांतता भंग हा ज्येष्ठ नागरिकांसाठी त्रासाचा भाग आहे.- मेट्रो तसेच अनेक पुनर्विकास प्रकल्पांच्या कामांमुळे वाढलेले प्रदूषण हा सुद्धा या मतदारसंघात कळीचा मुद्दा आहे. - महाविकास आघाडी विरुद्ध महायुती, अशी थेट लढत असल्याने, स्वतःला बांद्रा बॉय म्हणवणाऱ्या आशिष शेलार यांना आपली ही प्रतिमा जपण्यासाठी निश्चितच झगडावे लागणार आहे.  

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४वांद्रे पश्चिमआशीष शेलारभाजपाकाँग्रेस