वांद्रे पूर्वमधून मनसेकडून तृप्ती सावंत यांना उमेदवारी, मनसेचे एकूण १३५ उमेदवार रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 09:45 AM2024-10-30T09:45:53+5:302024-10-30T09:47:16+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : मनसे कायम ९ या आकड्याच्या प्रेमात असते. उमेदवारांच्या संख्येची बेरीज देखील ९ येत आहे.
Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वांद्रे पूर्व मतदारसंघातून माजी आमदार तृप्ती बाळा सावंत यांना उमेदवारी दिली आहे. तृप्ती सावंत यांनी उमेदवारी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी सकाळीच भाजपला सोडचिठ्ठी देत मनसेत प्रवेश केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना उमेदवारी अर्जही दिला. मनसेची १८ उमेदवारांची सातवी यादीही जाहीर झाली आहे. माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांना मनसेने इगतपुरीतून उमेदवारी दिली आहे. मनसेच्या एकूण उमदेवारांची संख्या आता १३५ झाली आहे. मनसे कायम ९ या आकड्याच्या प्रेमात असते. उमेदवारांच्या संख्येची बेरीज देखील ९ येत आहे.
तिरंगी लढत
तृप्ती सावंत या वांद्रे पूर्वमधीलच माजी आमदार आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे येथे तिरंगी लढत होणार आहे. उद्धवसेनेने येथून आदित्य ठाकरेंचे मावसबंधू वरुण सरदेसाई यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेस सोडून अजित पवार गटात आलेले झिशान सिद्दीकी देखील मैदानात उतरले आहेत.
इगतपुरीतून शिंदेसेनेतून मनसेत आलेल्या माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीचे हिरामण खोसकर, महाविकास आघाडीचे लकी जाधव यांच्यासोबत मेंगाळ यांची लढत होणार आहे.