अमित ठाकरेंविरोधात ठाकरे गटाची एकही सभा नाही; उद्धव ठाकरे म्हणाले, "मी मुंबईच्या बाहेर..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 01:36 PM2024-11-07T13:36:13+5:302024-11-07T13:46:12+5:30

Uddhav Thackeray : अमित ठाकरेंना माहीम विधानसभा निवडणुकीत छुपा पाठिंबा देत असल्याच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Maharashtra Assembly Election 2024 Uddhav Thackeray clarification on support to Amit Thackeray in Mahim assembly elections | अमित ठाकरेंविरोधात ठाकरे गटाची एकही सभा नाही; उद्धव ठाकरे म्हणाले, "मी मुंबईच्या बाहेर..."

अमित ठाकरेंविरोधात ठाकरे गटाची एकही सभा नाही; उद्धव ठाकरे म्हणाले, "मी मुंबईच्या बाहेर..."

Mahim Assembly Constituency : माहीम विधानसभा निवडणुकीकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागलं आहे. बारामतीनंतर माहीम विधानसभेची निवडणूक राज्यात सगळ्यात महत्त्वाच्या लढतींमध्ये आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच इथून निवडणूक लढवत असून त्यांच्यासमोर ठाकरे गटाचे महेश सावंत आणि शिंदे गटाचे सदा सरवणकर यांचे आव्हान आहे. अमित ठाकरे यांना ही निवडणूक सोपी होण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. अशातच अमित ठाकरे यांना काका आणि चुलत भावाची छुपी मदत मिळते का अशी चर्चा सुरू आहे. याचे कारण माहीममध्ये तूर्तास उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची एकही सभा होणार नसल्याचे समोर आलं आहे. ठाकरे गटाचा सभांच्या वेळापत्रकामध्ये १८ नोव्हेंबर पर्यंत दादर माहीमचा उल्लेख नसल्याचे चर्चांना उधाण आलं आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वरळीत आदित्य ठाकरेंविरोधत मनसेने उमेदवार न देऊन अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला होता. त्यामुळे माहीमध्येही असंच काहीसे चित्र पाहायला मिळेल अशी शक्यता होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी अमित ठाकरेंच्या विरोधात महेश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. पण १८ नोव्हेंबर पर्यंत दादर माहीम विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांची एकही सभा होणार नाही. ठाकरे गटाच्या सभांच्या वेळापत्रकातून ही माहिती पुढे आली आहे. त्यामुळेच उद्धव आणि आदित्य हे अमित ठाकरेंना पाठिंबा देत आहेत का असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र माहीम हा आमचाच मतदार संघ असून तिथे सहभाग घेण्याच्या आवश्यकता नाही असे स्पष्टीकरण उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.

"मला आवश्यकता नाही. माहीम हा माझा मतदारसंघ आहे. माहीम हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे. मुंबईमध्ये काल सभा झाली आणि १७ तारखेला आणखी एक सभा होणार आहे. यापलीकडे मी मुंबईच्या बाहेर आहे. कारण मुंबईकरांवर मला विश्वास आहे. एका ठिकाणी गेलो आणि एका ठिकाणी नाही गेलो तर असा अर्थ होत नाही की मी दुर्लक्ष करतोय. आता वेळच अशी आहे की दिवसाला चार चार पाच पाच सभा घेतल्या तरी मी सगळे मतदारसंघ पूर्ण फिरू शकत नाही. माझ्या चार सभेच्या वर सभा होतील असं वाटत नाही," असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

दरम्यान, निवडणुकीपूर्वीही ठाकरे गट माहीमबाबत अत्यंत गंभीर होता. शिवसेनेत फूट पडल्यानंतर माहीम विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी महेश सावंत यांच्याकडे औपचारिकपणे सोपवण्यात आली. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांची बंडखोरी झाली तेव्हाही येथील संघटना कमकुवत झाली नाही. राजकीय विश्लेषकांच्या मते महेश सावंत हे अत्यंत ताकदवान नेते आहेत. अमित ठाकरे यांना पाठिंबा द्यायचा असता तर त्यांनी थेट केले असते. या निवडणुकीबाबत उद्धव ठाकरे गंभीर होते. त्यामुळे त्यांनी तगडा उमेदवारही उभा केला. शिवसैनिकही मैदानावर जोमाने प्रचार करत आहेत.

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 Uddhav Thackeray clarification on support to Amit Thackeray in Mahim assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.