मुंबई - माहिम मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होणार आहे. या मतदारसंघात राज ठाकरे यांनी त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. त्यात ठाकरे गटाकडून इथं महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महायुतीकडून शिंदे गटाचे सदा सरवणकर हे पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहेत. गेल्यावेळी आदित्य ठाकरे हे पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले तेव्हा राज ठाकरेंनी त्यांच्याविरोधात मनसे उमेदवार न उतरवण्याचा निर्णय घेतला होता तसा या निवडणुकीत उद्धव ठाकरे तशी भूमिका घेतील असं बोललं जात होते. परंतु आता ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांनी राज ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे.
महेश सावंत म्हणाले की, २०१९ च्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंनीआदित्य ठाकरे यांच्यासाठी कुठे जाहीर पाठिंबा मागितला नव्हता ना.. त्यावेळी मनसेने उमेदवार उतरवायचा होता. काही लोकांचे दाखवण्याचे दात वेगळे असतात. त्यांच्याकडे तिथे उमेदवारच नाही. आज सुद्धा तिथे आयात उमेदवार दिला आहे. १०० टक्के सर्वसामान्य लोक माहिम मतदारसंघात माझा विचय खेचून आणणार आहेत. जास्तीत जास्त मतांनी मी या मतदारसंघात निवडून येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच मला कुणाचे आव्हान नाही, राजसाहेब खूप मोठे आहेत, मी सर्वसामान्य आहे. या मतदारसंघात सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाण्याचा दाब खूप कमी आहे. निवडून आल्यानंतर मी सुरुवातीला पाणी प्रश्न सोडवणार आहे. तो एक वर्षाच्या आत सर्व इमारतीमध्ये धो धो पावसासारखं पाणी येईल त्यासाठी प्रयत्न करेल. दुसरं म्हणजे आज लोक शिवाजी पार्कला आरोग्यदायी व्यायामासाठी येतात. मात्र धुळीमुळे तिथल्या नागरिकांच्या खूप तक्रारी आहेत. या तक्रारी सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे असं माहिमचे उमेदवार महेश सावंत यांनी म्हटलं.
राज ठाकरे काय म्हणाले होते?
आदित्यच्या वेळी मी विचार केला होता की माझ्या विरोधातला पक्ष असला तरी मी राजकारण आणि नातेसंबंध याच्यामध्ये काहीतरी बघत असतो. तिथे आमची ३८-३९ हजार मते असून देखील मला असं वाटलं की तो पहिल्यांदा निवडणूक लढवत आहे आपण उमेदवार नको द्यायला. हा माझा विचार झाला. मी जसा सुज्ञपणे विचार करतो तसा समोरचा विचार करेल अशी अपेक्षा मी ठेवत नाही. मी ती गोष्ट चांगल्या विचारांनी केली. समोरच्याला वाटत नसेल तर त्यांनी करू नये. मी त्यावेळी कोणाला फोन करून उमेदवार उभा करणार नाही असं सांगितलं नव्हतं. मला असं करा कोणी सांगितलं नव्हतं. मला त्या गोष्टीचा पश्चाताप नाही. हा प्रत्येकाच्या स्वभावाचा भाग झाला असं राज ठाकरेंनी म्हटलं होते.