मुंबई - माझी साहेबांसोबत जी चर्चा झाली, त्यात मी समाधानी आहे. नाराजी दूर झाली आहे. माझा भविष्यात पक्ष नक्कीच विचार करेल. पक्षाचा निर्णय अंतिम आहे. आम्ही पक्षाच्या कामाला लागू. माझी उमेदवारी नाकारली पण पुढे सन्मान करू असं पक्षाने सांगितले आहे. तुला नाउमेद करणार नाही असा शब्द उद्धव ठाकरेंनी दिल्याचं सुधीर साळवींनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे शिवडी येथील ठाकरे गटातील बंड थंड झाल्याचं चित्र पुढे आले आहे.
मातोश्रीवरील बैठकीनंतर सुधीर साळवी यांनी समर्थकांशी संवाद साधला. सुधीर साळवी म्हणाले की, पक्षाने जो उमेदवार दिला त्याचा आम्ही प्रचार करू. मी उमेदवारी मागितली होती पण ती नाकारली. पक्षप्रमुख माझा भविष्यात सन्मान करतील. उद्धव ठाकरेंसोबत जी चर्चा झाली त्यात समाधानी आहे. शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. मी प्रत्येक शिवसैनिकाशी भेट घेईन त्यांना समजावेन असं त्यांनी माध्यमांना सांगितले.
समर्थकांना काय बोलले सुधीर साळवी?
१९९१ सालापासून मी लालबाग शाखेत काम करायला सुरुवात केली होती. शिवसेनेचे बाळकडू घेतले. गेली अनेक वर्ष मी काम करतोय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या शिकवणीप्रमाणे काम करत आलोय. मी आयुष्यात कधी राजकारण केले नाही. मी शिवसेनेची उमेदवारी मागितली होती. तुम्ही सर्वांनी मला साथ दिली, त्यासाठी तुमचे दंडवत. हा शिवसेनाप्रमुखांचा बालेकिल्ला आहे. आम्ही नेहमी समाजकारणावर भर दिला आहे. मला उमेदवारी न दिल्याने तुम्ही नाराज झालात. इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही याल, लोकांच्या मनात ही भावना होती. उमेदवारी न मिळाल्याने अपेक्षाभंग झाला आहे. तुमच्या प्रत्येकाच्या मनातला आमदार सुधीर साळवी आहे
आज २० मिनिटे माझी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाली. पक्ष काय, संघटना काय हे अनेकदा मी शिवसैनिकांना सांगितले. मी ज्या भावनेने उमेदवारी मागितली होती. माझी उमेदवारी नाकारली असली तरी मी पक्षासोबत आजही प्रामाणिक होतो, उद्याही असेन. मला पक्षासोबत राहणे आणि निष्ठा कळते. तुम्ही प्रचंड नाराज होता, तुमचे पाठबळ मोठे आहे. माझे घर २४ तास तुमच्या सेवेसाठी उघडे असेल. शिवडी लालबाग परळ हे सांस्कृतिक माहेरघर आहे. उत्सवातून कार्यकर्ते घडतात. सुधीर तुला नाउमेद करणार नाही असा शब्द उद्धव ठाकरेंनी दिला आहे. माझा पक्षप्रमुखांवर विश्वास आहे. पक्षप्रमुखाचा निर्णय शिरसावंद्य असेल असं सुधीर साळवींनी समर्थकांना सांगितले.