अमित ठाकरे बालिश, त्याला राजकारण काय कळतं; ठाकरेंचे उमेदवार महेश सावंतांची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 10:59 AM2024-11-11T10:59:55+5:302024-11-11T11:01:35+5:30
माहिमचे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांनी राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यावर पलटवार केला.
मुंबई - अमित ठाकरे बालिश तो काहीही बोलू शकतो, त्याला राजकारणातलं काही कळतं का..? वक्तव्ये करायला स्वातंत्र आहे. देशात बोलण्याला कुणाला बंदी नाही. जनता सुज्ञ आहे अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांनी अमित ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर केली आहे.
महेश सावंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले की, जनतेसाठी कोण उपलब्ध होईल, कोण कुठे भेटेल हे जनतेने बोलावे. मी पण काहीही बोलू शकतो. आपण जनतेच्या कोर्टात जात आहोत. कालची सभा आमची बघा आणि त्यांचीही बघा, दोन्ही सभा पाहिल्यावर लगेच कळेल की स्थानिक माणसे कोणती आणि भाडोत्री माणसे कोणती..गर्दी कुठे जमली होती ते दिसून येते असा पलटवार महेश सावंत यांनी राज ठाकरेंवर केला.
तसेच माणसाचा कधीतरी अपघात होतो, अपघातानंतर कधीतरी पूर्वस्थितीत येतो. मी कुठे नाही म्हणतो, माझा तो अपघाताचा दिवस होता परंतु माझे तेव्हाची क्लिप काढा, माझी मान खाली होती ती वरती आलीच नाही. मी रात्रभर गिरगाव चौपाटीवर रडत होतो. शिवसेना आमच्या हृदयात आहे ती हृदयातून जाणार नाही असं प्रत्युत्तर महेश सावंत यांनी राज ठाकरेंना दिले आहे. महेश सावंत यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता त्यावर राज यांनी टीका केली होती.
दरम्यान, आमदाराने जी काही गद्दारी केली, त्याचा तिरस्कार लोक करतायेत. २० तारखेला तुम्हाला दिसेल. लोक चिडून बाहेर येतील. शिवाजी पार्कातील धुळीचा त्रास आम्हालाही होतो. मी निवडून आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पार्कातील धुळीबाबत एक उच्चस्तरीय बैठक घेणार, धुळीपासून मुक्त करण्याचं ज्यांना ज्ञान आहे अशा लोकांसोबत चर्चा करून यावर पहिली उपाययोजना करणार. मी सगळे मैदानी खेळ खेळतो. मैदानी खेळ माझ्या आवडीचे आहे. मी प्रचारात फिरतो, बाकीच्या उमेदवारांची दमछाक झाली आहे. मी सकाळी ७ वाजल्यापासून रात्री २ पर्यंत फिरतोय. मला दम लागत नाही. व्यायाम करून शरीर दगडासारखं झालंय. उन्ह, पाऊस, वारा सगळे सहन करण्याची ताकद आहे. प्रत्येकाच्या घरोघरी जाण्याचा मी प्रयत्न करतोय. मच्छिमार कॉलनीत २८ इमारती आहेत, ४ मजल्याच्या तिथे प्रत्येक ठिकाणी गेलो. घरोघरी लोकांचा आशीर्वाद घेतोय. मी कुठल्याही खेळाच्या स्पर्धेला प्रोत्साहन देतो. कबड्डीची राज्यस्तरीय स्पर्धा मी आयोजित करतो. बक्षिसे लाख-दीड लाख देतो. शिवाजी पार्कात मला ऑल इंडिया कबड्डी स्पर्धा घ्यायची आहे. सगळ्यांना कबड्डीची आवड निर्माण व्हावी. दादरपासून माहिमपर्यंत क्रिकेटची पंढरी आहे. क्रिकेट अॅकेडमीसाठी मला वेगळा काहीतरी प्रयोग करायचा आहे. मला क्रिकेटबद्दल माहिती नाही पण मी जाणून घेईन असं महेश सावंत यांनी म्हटलं.
"माहिमची एकता महाराष्ट्र बघेल"
आपण भारताची लोकशाही मानतो. इथं जातीधर्माचा न्याय नाही. भारत भूमीवर ज्याने जन्म घेतला तो संविधानानुसार चालतो. मुंबईत येणारा माणूस स्वत:ची प्रगती करण्यासाठी येतो. जाती-धर्मासाठी कुणाला वेळ नाही. आज जो तो स्वत:चं कुटुंब कसं मोठं होईल यात गुंग आहे. ज्यांना काम नाही ते बटेंगे तो कटेंगे असं बोलत असतात. १९९२ दंगलीनंतर कुठे दंगल झाली का?. हम सब एक है, सगळ्या जाती धर्माची लोक माहिममध्ये राहतात. यापुढे माहिमची एकता महाराष्ट्र बघेल. मुस्लीम समाज हिंदूंच्या सणांमध्ये सहभागी होणार, आम्ही सगळे एकतेची ताकद माहिममधून दाखवून देऊ असं विधानही महेश सावंत यांनी केले.