मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाची मुंबईतील तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात ३ मतदारसंघाचा समावेश आहे. वर्सोवा येथून हरुन खान, घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून संजय भालेराव आणि विलेपार्ले मतदारसंघातून संदीप नाईक यांना पक्षाकडून उमेदवारी दिली आहे. हे तिघेही महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहे. विशेष म्हणजे या यादीत मुस्लीम चेहऱ्याचा ठाकरे गटाने समावेश केला आहे.
ठाकरे गटाकडून मुंबईतल्या आतापर्यंत मागाठाणे, विक्रोळी, भांडूप पश्चिम, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, अंधेरी पूर्व, चेंबूर, कलिना, कुर्ला, वांद्रे पूर्व, वडाळा, माहिम, वरळी, शिवडी, भायखळा, विलेपार्ले, वर्सोवा, घाटकोपर पश्चिम या जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. तर काँग्रेसनं आतापर्यंत मालाड पश्चिम, चांदिवली, मुंबादेवी, धारावी या चार जागांवर उमेदवार जाहीर केलेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाने घाटकोपर पूर्व येथून राखी जाधव यांना रिंगणात उतरवलं आहे तर अणुशक्तीनगर या जागेवर उमेदवार घोषित होणे बाकी आहे.
दहिसर जागेवर अद्याप उमेदवार नाही
दहिसर मतदारसंघात ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर हे इच्छुक आहेत. परंतु अद्याप याठिकाणी घोसाळकरांची उमेदवारी जाहीर झाली नाही. त्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे. इथं विनोद घोसाळकर यांच्याऐवजी अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर यांना तिकीट देण्याचीही मागणी होत आहे. त्यामुळे घोसाळकर कुटुंबातील कुणाला ठाकरे गट उमेदवारी देणार हे पाहणे गरजेचे आहे.
घाटकोपर पश्चिम मतदारसंघात ३ जुन्या मनसैनिकांमध्ये लढत
घाटकोपर पश्चिम मतदारसंघात ठाकरे गटाने संजय भालेराव यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात भाजपाने राम कदम आणि मनसेनं गणेश चुक्कल यांना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे हे तिघेही एकेकाळी एकाच पक्षात काम करत होते. संजय भालेराव हे मनसेचे माजी नगरसेवक आणि तिथले विभाग अध्यक्ष होते. मात्र काही कारणास्तव त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. राम कदम हे मनसेच्या पहिल्या १३ आमदारांपैकी एक होते. तर गणेश चुक्कल हे सध्या मनसेचे विभाग अध्यक्ष असून ते यंदाच्या निवडणुकीत उभे आहेत.