मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या ४ जागांवरील उमेदवार आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून ठरवण्यात आले. त्यात वर्सोवा, घाटकोपर पश्चिम, मलबार हिलसह दहिसर विधानसभा मतदारसंघाचा समावेश होता. दहिसरमध्ये घोसाळकर कुटुंबापैकी कुणाला उमेदवारी द्यायची असा पेच पक्षात होता. त्यात आधी तेजस्वी घोसाळकर यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर काही वेळात विनोद घोसाळकर यांचं नाव समोर आले.
गेल्या अनेक महिन्यापासून दहिसर मतदारसंघात विनोद घोसाळकर इच्छुक आहेत. त्याठिकाणी तेजस्वी घोसाळकर यांच्या नावाचीही चर्चा होती. त्यामुळे सासरे आणि सूनेत उमेदवारी कोणाला मिळणार असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला होता. अखेर आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दहिसर मतदारसंघाबाबत बैठक घेण्यात आली. त्यावेळी घोसाळकर कुटुंबाला AB फॉर्म देण्यात आला.
सुरुवातीला शिवसेना ठाकरे गटाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दहिसर मतदारसंघात तेजस्वी घोसाळकर या अधिकृत उमेदवार असल्याचं घोषित करण्यात आले. मात्र काही वेळाने तेजस्वी यांच्याऐवजी विनोद घोसाळकर यांचं नाव देण्यात आले. त्यामुळे दहिसर मतदारसंघाच्या उमेदवारीत नेमकी अदलाबदल कशी झाली हा प्रश्न आहे.
दरम्यान, याआधीही शिवसेना ठाकरे गटाने पहिली यादी जाहीर केली तेव्हा काही वेळाने पक्षाचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी ही यादी चुकून आली असून ती आमची प्रशासकीय चूक आहे असं जाहीर कबूल केले होते. या यादीत मित्रपक्षांच्या जागांवरही ठाकरे गटाने उमेदवार जाहीर केले. यातील काही जागांवर महाविकास आघाडीत वाद होता. मात्र ठाकरेंच्या यादीमुळे मविआतील विसंवाद पुढे आला. त्यात पहिल्या यादीतील काही जागा आणि उमेदवारांच्या अदलाबदलीबाबतही अद्याप महाविकास आघाडीत चर्चा सुरू आहे.
मुंबईतील आतापर्यंत २१ जागांवर ठाकरेंनी जाहीर केले उमेदवार
मागाठाणे - उदेश पाटेकरविक्रोळी - सुनील राऊतभाडुंप पश्चिम - रमेश कोपरगावकरजोगेश्वरी पूर्व - बाळा नरदिंडोशी - सुनील प्रभूगोरेगाव - समीर देसाईअंधेरी पूर्व - ऋतुजा लटकेचेंबूर - प्रकाश फातर्पेकरकुर्ला - प्रविणा मोरजकरकलिना - संजय पोतनीसवांद्रे पूर्व - वरूण सरदेसाईमाहिम - महेश सावंतवरळी - आदित्य ठाकरेदहिसर - विनोद घोसाळकरवर्सोवा - हरुन खानमलबार हिल - भैरूलाल चौधरी जैनघाटकोपर पश्चिम - संजय भालेरावभायखळा - मनोज जामसुतकर शिवडी - अजय चौधरीविलेपार्ले - संदिप नाईकवडाळा-श्रद्धा जाधव