मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 08:36 PM2024-11-19T20:36:03+5:302024-11-19T20:37:57+5:30
निवडणूक आयोगाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर विनोद तावडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
Vinod Tawde : विरारच्या विवांता या हॉटेलमध्ये सकाळी भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे हे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. या गोंधळादरम्यान, भाजप आणि बविआचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे पाहायला मिळालं. पैसे वाटत असल्याचा आरोप झाल्यानंतर आमदार क्षितीज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर हे देखील हॉटेलमध्ये दाखल झाले होते. याप्रकरणी विनोद तावडे यांच्याविरोधात निवडणूक आयोगाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर आता विनोद तावडे यांनी या सगळ्या प्रकाराबाबत माहिती दिली आहे.
विरारच्या विवांता हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे आणि राजन नाईक हहे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये गोंधळ घातला. यानंतर बविआचे प्रमुख हितेंद्र ठाकूर आणि आणि नालासोपाऱ्याचे आमदार क्षितिज ठाकूर हे दाखल झाले होते. यावेळी हितेंद्र ठाकूर यांनी माध्यमांशी बोलताना भाजपच्या लोकांनीच मला विनोद तावडे पैसे वाटण्यासाठी येणार असल्याचे सांगितल्याचे म्हटलं. मात्र आता विनोद तावडे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
"विरारच्या राड्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल झाले आहेत. आपण पत्रकार परिषद घेतली त्याचा एक गुन्हा दाखल आहे. माझा मतदारसंघ नसताना मी तिथे गेलो यावर दुसरा गुन्हा दाखल झाला. तर हितेंद्र ठाकूर त्या ठिकाणी आले त्यावर तिसरा गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी पैसे वाटप झाल्याचा कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. या सगळ्या बातम्या खोट्या आहेत. शंका आली तर तुम्ही सीसीटीव्ही तपासा," असं विनोद तावडे यांनी म्हटलं.
"हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलं की भाजपच्या नेत्यांनी टीप दिली. मात्र हे धादांत खोटं आहे. नंतर गाडीतून जाताना त्यांनी मला काय सांगितलं हे मला माहिती आहे. यामध्ये काहीही तथ्य नाही," असं स्पष्टीकरण विनोद तावडे यांनी दिलं.
"मी प्रचार संपल्यानंतर लोकांना भेटायला जात असतो. त्यामुळे मी राजन यांना फोन केला. त्यांनी मला चहाला बोलवलं. तरीही शंका आली असेल तर सीसीटीव्ही तपासा," असेही विनोद तावडे यांनी म्हटलं.
"तुम्ही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने हे कारस्थान रचलं का असा सवालही यावेळी विचारण्यात आला. त्यावर बोलताना विनोद तावडे यांनी, "मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीविषयी मी म्हणतो की ओन्ली राष्ट्र, नो महाराष्ट्र. पक्षातल्या कुणालाच माहिती नव्हतं की तिकडे जाणार आहे. त्यामुळे असा काहीच विषय नाही," असं म्हटलं.