आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 05:21 PM2024-11-19T17:21:57+5:302024-11-19T17:22:44+5:30
आदित्य ठाकरे यांनी सोशल मिडिया पोस्टच्या माध्यमातून आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप भाजपने केला आहे.
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची वेळ संपलेली असतानाही वरळी मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार आदित्य ठाकरे यांनी सोशल मिडिया पोस्टकरून नियमभंग केल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजपच्या विरोधात आक्षेपार्ह ट्वीट केल्याप्रकरणी मुंबई भाजप सचिव प्रतिक कर्पे यांनी आदित्य ठाकरेंच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे लेखी स्वरूपात तक्रार केली आहे. आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.
आदित्य ठाकरे यांच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरून मंगळवारी सकाळी ११ वाजल्याच्या सुमारास पोस्ट केल्याचा आरोप भाजपने केला आहे. 'भाजपाच्या कच्च्या बच्च्यांची अत्यंत घाणेरडी मानसिकता! फोडा आणि राज्य करा खोटं बोला आणि जिंकायचा प्रयत्न करा! निवडणूक आयोग आणि मुंबई पोलीस कधी अशा घाणेरड्या द्वेष निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करणार का आणि महाराष्ट्रद्वेष्ट्यांना अटक करणार का? तुमच्या मतांसाठी आमच्या जनतेच्या भावनांशी खेळू नका!," असं ट्वीट आदित्य ठाकरेंनी केलं होतं.
त्यामुळे निवडणूक आचासंहितेच्या नियमाप्रमाणे मतदानाच्या ४८ तासांपूर्वी प्रचार किंवा राजकीय टीका टिप्पणी करण्यास बंदी आहे. मात्र, या ट्विटमुळे झालेले नियमांचे उल्लंघन लक्षात घेता निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेतली पाहिजे, अशी मागणी भाजपने केली आहे.
"आदित्य ठाकरे यांनी खोडसाळ पद्धतीने द्वेष पसरवण्याच्या हेतूने आणि सर्वसामान्य मतदारांची दिशाभूल करण्यासाठी भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. त्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत, त्यांच्या या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करत असून निवडणूक आयोगाने आदित्य ठाकरे यांच्यावर त्वरित करून त्यांचे एक्स अकाऊंटव निर्बंध आणावेत," अशीही मागणी मुंबई भाजप सचिव प्रतिक कर्पे यांनी केली आहे.