मुंबई : २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या युतीमुळे सायन-कोळीवाडा मतदारसंघातून भाजप उमेदवार कॅप्टन आर. तमिळ सेल्वन १४ हजार मतांनी विजयी झाले होते. त्यावेळी या मतदारसंघात १३ हजार मतांसह मनसे तिसऱ्या क्रमांकावर होती.
यंदा मात्र, मनसेने या मतदारसंघातून अद्याप उमेदवार दिलेला नाही. मनसेने उमेदवार दिला नाही तर युती व आघाडीच्या बदललेल्या राजकीय समीकरणाचा फायदा काॅंग्रेसच्या उमेदवाराला होणार का, अशी चर्चा येथे रंगली आहे. २०१९ मध्ये सायन-कोळीवाडातून भाजपचे उमेदवार कॅप्टन आर. तमिळ सेल्वन यांनी काॅंग्रेसच्या गणेश यादव यांचा जवळपास १४ हजार मतांनी पराभव केला होता.
यंदा येथे पुन्हा हेच दोन्ही उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. या ठिकाणी मराठी, दक्षिण भारतीय, मुस्लीम समाजातील मतदारांची संख्या लक्षणीय आहे. गेल्या वेळच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्र लढली होती. आता भाजपसोबत शिंदेसेना आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते आहेत. तर, काॅंग्रेससोबत उद्धवसेनेचे कार्यकर्ते आहेत. या मतदारसंघात महापालिका वॉर्डातही शिवसेनेच्या दोन्ही गटांचे प्राबल्य आहे.
महायुती-मविआमध्ये अटीतटीची शक्यतानुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथून अनिल देसाई यांना ७० हजार मते मिळाली होती. तर शिंदेसेनेच्या राहुल शेवाळे यांना ६१ हजार मते मिळाली होती. विधानसभा आणि लोकसभेचे मुद्दे वेगळे असले तरी नऊ हजारांपैकी किती मते भाजपच्या पारड्यात पडतात हाही निवडणुकीच्या निकालानंतर विश्लेषणांचा मुद्दा होऊ शकेल. दरम्यान, २०१९ च्या निवडणुकीत या मतदारसंघातून एकूण ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मनसेचे उमेदवार अनंत कांबळे यांनी १३ हजार ६६० मते घेतली होती, तर वंचितने या मतदारसंघातून ११,५४९ मते घेतली होती. नोटाला ३२५६ मते मिळाली होती.