Worli Assembly constituency : विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ४५ उमेदवार जाहीर केले आहेत. राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे माहीम-दादर विधानसभा मतदारसंघातून विधानसभा लढवणार आहेत. तर मनसे नेते संदीप देशपांडे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघात विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांच्याशी त्यांची लढत होणार आहे. गेल्या निवडणुकीत मनसेने या मतदारसंघात उमेदवार न देता आदित्य ठाकरे यांना अप्रत्यक्षरित्या पाठिंबा दिला होता. मात्र यावेळी आदित्य ठाकरेंविरोधात संदीप देशपांडे यांना उतरवण्यात आलं आहे. याच पाश्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संदीप देशपांडे यांना खास मेसेज दिला आहे.
वरळी विधानसभा मतदारसंघात संदीप देशपांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे वरळीत पुतण्याच्या विरोधात राज ठाकरेंनी आपल्या तगड्या उमेदवाराला संधी दिल्याची चर्चा रंगली आहे. यावेळी आदित्य ठाकरेंचा मनसेच्या संदीप देशपांडे यांच्याशी सामना रंगणार आहे. महायुतीने वरळीत उमेदवार जाहीर केल्यास तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातील निवडणुकीत राज ठाकरे यांनी लक्ष घातल्याचे दिसत आहे. पुतण्याविरुद्ध लढताना राज ठाकरे यांनी संदीप देशपांडे यांना खास संदेश दिला आहे. त्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरु झाली आहे.
संदीप देशपांडे यांच्या प्रचारासाठी वरळीमध्ये मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरेंच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंविरोधात मैदानात असलेल्या संदीप देशपांडेंना एक विशेष संदेश दिला. कार्यालयाच्या उद्घाटनानंतर राज ठाकरेंनी पहाणी केली. त्यानंतर राज ठाकरेंना अभिप्राय लिहिण्यासाठी कॅटलॉग देण्यात आला. या कॅटलॉगमध्ये राज ठाकरेंनी संदीप देशपांडेंसाठी एक खास मेसेज लिहीला. राज ठाकरे यांनी त्यामध्ये "प्रिय संदिप देशपांडे, सस्नेह जय महाराष्ट्र! वरळीतून तुला निवडून यावचं लागेल! शुभेच्छा" असा संदेश लिहिला आहे.
आदित्य ठाकरेंना कुठल्याच गोष्टीचं आव्हान वाटत नाही - संदीप देशपांडे
"निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. मनसेने प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. आज राज ठाकरे यांनी वरळीमध्ये मनसेच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन केले. मनसे घराघरात जाऊन कामाचे मुद्दे पोहोचवत आहे. आदित्य ठाकरेंना कुठल्याच गोष्टीचं आव्हान वाटत नाही. २० तारखेला त्यांना जनतेचे आव्हान कळेल. शेवटी आव्हान प्रतिस्पर्ध्याचे नसते. तुम्ही जनतेची कामं केली आहेत की नाही हा महत्त्वाचा विषय आहे. जनतेची कामं केली नसतील तर मग काय? जो काम करतो तो काम दाखवतो. काही पत्र्याचे शेड बांधण्याला काम म्हणत असाल तर आमच्या त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा," असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.