महेश पवार, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर झालेले सर्वपक्षीय उमेदवार आणि इच्छुकांनी मतदारसंघांमधील विविध घटकातील नेत्यांच्या, सोसायटी अध्यक्षांच्या, मंडळ कार्यकत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार मराठी मतदार ३४ टक्के असून त्यापाठोपाठ उत्तर भारतीय, अल्पसंख्याक, गुजराती मते आहेत.
मुंबई शहराच्या लोकसंख्येत गेली काही वर्षे सातत्याने वाढ होत आहे. १९०१ मध्ये ९ लाख असलेल्या मुंबईच्या लोकसंख्येने आता १ कोटींचा टप्पा पार केला आहे. लोकसभेच्यावेळी अल्पसंख्याक, दलित, दक्षिण भारतीय हे समाज घटक प्रामुख्याने महाविकास आघाडीच्या बाजूने उभे राहिल्याचे चित्र होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत हेच चित्र कायम राहील, याबाबत राजकीय वर्तुळात साशंकता व्यक्त होत आहे. कुलाबा, मलबार हिल, बांद्रा, अंधेरी, चारकोप, कांदिवली या मतदारसंघात मराठी, गुजराती, जैन, ब्राह्मण समाजाचे प्राबल्य आहे, तर मुंबादेवी, भायखळा, वांद्रे, जोगेश्वरी, अणुशक्ती नगर, कुर्ला, मानखुर्द, कालिना येथे हिंदी आणि अल्पसंख्याक मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. भांडूप, मुलुंड, गोरेगाव, दिंडोशी, चारकोप, शिवडी, वडाळा, माहीम, विक्रोळी मतदारसंघात मराठीसह इतर भाषिक मोठ्या प्रमाणात आहेत.
उच्च आणि मध्यमवर्गीय उच्चभ्रू वसाहती तर दुसरीकडे मध्यमवर्गीय, झोपडपट्टी अशी मुंबई विभागली आहे. त्यातही पूर्व उपनगरात अनुसूचित जातीची मतदारसंख्या मोठी असून एकूण मतदारांमध्ये त्यांचा वाटा ५ ते १५ टक्के इतका आहे. चेंबूर, घाटकोपर, वडाळा, अँटॉप हिल, धारावी येथे या मतदारांचे प्रमाण सर्वाधिक आहे.