Join us

Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 6:57 PM

Harun Khan Versova Assembly Election 2024 Candidates: महाराष्ट्र विधानसभेच्या वर्सोवा मतदारसंघात यावेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने हारुन खान यांना उमेदवारी दिली आहे. सोशल इंजिनिअरिंग रणनीतीचा भाग म्हणून याकडे पाहिले जात आहे.

मनोहर कुंभेजकर,मुंबईWho is harun Khan Shiv Sena UBT Candidate: महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडून अल्पसंख्यांक उमेदवार देण्याबाबतचा विचार करण्याचे आवाहन मुस्लीम समाजाच्या वतीने करण्यात आले होते. वर्सोव्यात सुमारे १ लाख १० हजार अल्पसंख्यांक मतदार आहे. तसेच भाजपच्या व एमआयएमच्या रणनीतीला उत्तर देण्यासाठी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी वर्सोवा विधानसभेतील उद्धव सेनेचे प्रभाग क्रमांक ६३ व ६४ चे उपविभागप्रमुख हारून खान यांना उमेदवारी दिली आहे.

कोण आहेत हारून खान?

 गेली ३० वर्षे गटप्रमुख, शाखाप्रमुख, उपविभागप्रमुख अश्या चढत्या क्रमाने पक्षाचे काम निष्ठेने करणारे व पक्षफुटीनंतर उध्दव ठाकरे यांच्या मागे ते ठामपणे उभे राहिले.जन्माने अल्पसंख्यांक असूनसुद्धा गणपतीची आरती व संस्कृत भाषेतील श्र्लोक ते  स्पष्ट शब्दात म्हणतात.

त्यांना उमेदवारी मिळाल्यामुळे विधानसभा क्षेत्रात संमिश्र प्रतिक्रिया ऐकायला मिळतात. स्थानिक पदाधिका-यांमध्ये दोन गट पडले तरी उद्धव सेनेत हारून खान यांना उमेदवारी मिळाली म्हणून आनंदाचे आहे. त्यांची बायको २०१७  साली नगरसेविका म्हणून प्रभाग क्र ६४ मधून निवडून आली होती.

भाजपचा विद्यमान आमदार

वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून गेल्यावेळी भाजपचा उमेदवार निवडून आला होता. भारती लव्हेकर या सलग दुसऱ्यांदा या मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. भारती लव्हेकर यांना ४१,०५७ मते मिळाली होती. तर काँग्रेसच्या बलदेव खोसा यांना ३५,८७१ मते मिळाली होती. 

मनसेचे उमेदवार संदेश देसाई यांना ५ हजार मते मिळाली होती. राजूल सुरेश पटेल यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती आणि ३२ हजार मते घेतली होती. त्यामुळे या मतदारसंघातील यावेळचा निकाल उत्कंठा वाढवणारा असणार आहे.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४मुंबई विधानसभा निवडणूकवर्सोवामहायुतीमहाविकास आघाडी