- दीपक भातुसे मुंबई - मुंबई उत्तर आणि उत्तर पश्चिम भागात असलेल्या १२ मतदारसंघांचे पूर्वीच्या काही निवडणुकांतील चित्र बघितले, तर भाजप आणि एकसंध शिवसेनेचा वरचष्मा राहिला आहे. मात्र, महायुती आणि महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा होत असलेल्या या निवडणुकीत युती विरुद्ध आघाडीतील मुकाबल्यात या भागातील काही मतदारसंघांचे गणित बदलू शकते. भाजपने या भागात चांगला जम बसवला असला, तरी काही मतदारसंघांत यावेळी चुरशीची लढत होईल. २०१९ची निवडणूक शिवसेना-भाजपने एकत्र लढवली होती. शिवसेना फुटीनंतर होणाऱ्या या निवडणुकीत काही मतदारसंघांत शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेना, तर काही मतदारसंघांत भाजप विरुद्ध उद्धवसेना आणि काँग्रेस असा सामना होणार आहे.
बोरिवली मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला, मात्र येथे सलग तिसन्यांदा भाजपने उमेदवार बदलण्याची आणि बाहेरील उमेदवार देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. इये भाजपने कुणालाही उमेदवारी दिली तरी तो जिंकतो. मात्र, यावेळी पुन्हा संजय उपाध्याय है बाहेरील उमेदवार दिल्याने प्रचंड धुसफूस आहे. गोपाळ शेट्टींनी माघार घेतली असली, तरी भाजपला नाराजीचा फटका बसू शकतो. उद्धवसेनेने संजय भोसले हा मराठी चेहरा दिला आहे.
दहिसर मतदारसंघातील सामनाही यावेळी चुरशीचा होऊ शकतो. विद्यमान आमदार मनीषा चौधरी विरुद्ध विनोद घोसाळकर यांच्यात इथे लढत होत आहे. २०१४ला घोसाळकरांचा पराभव झाला होता. मोदी लाट आणि पक्षाअंतर्गत गटबाजीचा फटका, घोसाळकरांना बसला होता. आताही शिवसेनेतील फूट, मनसेचा उमेदवार या घोसाळकरांसाठी अडचणीच्या बाजू आहेत. मागाठाणे मतदारसंघात विद्यमान आमदार प्रकाश सुर्वे विरुद्ध उद्धवसेनेकडून दिलेला नवीन चेहरा उदेश पाटेकर यांच्यात सामना आहे. सुर्वे यांचा जनसंपर्क दांडगा आहे. मात्र, यावेळी शिवसेनेत फूट पडल्यामुळे चुरस आहे. शिवसैनिक एकनाथ शिंदेवरोबर आहे की, उद्धव ठाकरेंबरोबर, हे स्पष्ट होणार आहे.
कांदिवली पूर्व मतदारसंघातही भाजपने चांगले प्रस्थ निर्माण केले आहे. यावेळी काँग्रेसने इथून कालू, बुधेलिया यांना उमेदवारी दिली आहे. मागील निवडणूक त्यांनी चारकोपमधून लढवली होती. भाजपचे विद्यमान आमदार अतुल भातखळकर यांच्यासमोर तगडे आव्हान नसल्याने भाजपसाठी ही लढाई सोपी मानली जाते.
चारकोप हाही भाजपचा बालेकिल्ला. योगेश सागर इथून सलग तीन वेळा जिंकले आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसने यशवंत सिंग हा उत्तर भारतीय चेहरा दिला आहे. या मतदारसंघात बैठ्या चाळी मोठ्या संख्येने असून, त्यांचे प्रश्न गेले अनेक वर्षे प्रलंबित आहेत. याशिवाय काँग्रेसची पारंपरिक मते मराठी आणि उत्तर भारतीय मते एकत्र आली, तर ती सागर यांना डोकेदुखी ठरू शकते. मालाड पश्चिम हा काँग्रेसचा गड मानला जातो. येथे अस्लम शेख जिंकतात. यावेळी त्यांच्यासमोर भाजपने आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार यांना उभे केले आहे. आशिष शेलार यांची प्रतिष्ठा इथे पणाला लागली आहे. भाजपपासून दुरावलेल्या अल्पसंख्याक समाजाची इथे मोठ्या संख्येने मते आहेत. लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबईत भाजपचे पीयूष गोयल यांना याच एकमेव मतदारसंघात आघाडी नव्हती. त्यामुळे विधानसभेसाठीही भाजपला हा मुकाबला तसा अवघडच आहे.
उत्तर-पश्चिममधील जोगेश्वरी पूर्व हा मतदारसंघ विद्यमान खासदार रवींद्र वायकर यांचा. शिंदेसेनेने इथे वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांना उमेदवारी दिली आहे, तर समोर उद्धवसेनेचे अनंत (बाळा) नर हे उमेदवार आहेत. वायकरांसाठी ही लढाई सोपी नाही. कारण लोकसभा निवडणुकीत त्यांना विजय मिळाला असला तरी त्यांच्या स्वतःच्या विधानसभा मतदारसंघात ते पिछाडीवर होते. याचा अर्थ वायकर जरी शिंदेसेनेबरोबर गेले असले तरी इथला शिवसैनिक उद्धव ठाकरेंबरोबर आहे, याचा फायदा नर यांना होऊ शकतो.
२०१४ च्या मोदी लाटेत भाजप आणि शिवसेना वेगळे लढले तेव्हा भाजपच्या विद्या ठाकूर यांनी शिवसेनेचे सुभाष देसाई यांचा पराभव केला होता. त्यानंतर २०१९लाही ठाकूर जिंकल्या. लोकसभा निवडणुकीतही वायकर यांना गोरेगाव या विधानसभा मतदारसंघातून २४ हजार मतांची आघाडी मिळाली होती. यावेळी उद्धवसेनेने माजी नगरसेवक समीर देसाईंना संधी दिली आहे. त्यांच्यासाठी ही लढाई जिकिरीची असेल.
मोदी लाटेत २०१४ मध्ये वर्सोवा मतदारसंघातून नवख्या भारती लवेकर यांचा विजय झाला होता. भाजपाने त्यांना पुन्हा संधी दिली आहे. उद्धवसेनेने यावेळी इथून हरुण खान हा मुस्लीम चेहरा मैदानात उत्तरवला आहे. यावेळी लवेकर यांच्यासाठी लढाई सोपी नाही. उद्धवसेनेच्या अमोल कीर्तिकर यांनी लोकसभेला येथून २० हजारांपेक्षा जास्त मतांची आघाडी होती. उद्धवसेनेने यावेळी इथून हरुण खान हा मुस्लीम चेहरा मैदानात उत्तरवला आहे. यावेळी लवेकर यांच्यासाठी लढाई सोपी नाही.
अंधेरी पूर्वमधून उद्धवसेनेने ऋतुजा लटके यांना पुन्हा संधी दिली आहे. तर त्यांच्याविरोधात शिंदेसेनेचे मुरजी पटेल उभे आहेत. मुरजी पटेल हे मुळचे भाजपचे आहेत, हा मतदारसंघ शिंदेसेनेकडे गेल्याने त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. २०१९ च्या निवडणुकीत इथे ऋतुजा लटके यांचे पती रमेश लटके विजयी झाले होते. त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोट निवडणुकीत मुरजी पटेल यांनी भाजपकडून अर्ज भरला होता; मात्र पोटनिवडणुकीत उमेदवार नको, अशी भूमिका पक्षाने घेतल्याने त्यांना अर्ज मागे घ्यावा लागला होता.
अंधेरी पश्चिम या मतदारसंघातही भाजपने जम बसवला आहे. अमित साटम इथून विजयी होत आले आहेत; मात्र लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांना केवळ २२१ मतांची आघाडी मिळाली होती. यावेळी काँग्रेसने माजी आमदार अशोक जाधव यांना उभे केले आहे. आधी इथे सचिन सावंत यांना उमेदवारी दिली होती; मात्र त्यांनी लढण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर काँग्रेसने जाधव यांना उभे केले. काँग्रेसमधील हा गोंधळ लक्षात घेता हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी अशोक जाधव यांना मेहनत करावी लागणार आहे.
भाजपचा जीव भांड्यात- बोरीवली मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार आणि माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी बंडखोरी केली होती. स्वतः गोपाळ रोट्टी इथून लढायला तयार होते. मात्र सलग तिसऱ्यांदा इथे भाजपकडून बाहेरील उमेदवार दिल्याने पक्षांतर्गत असलेल्या नाराजीला शेट्टी यांनी अपक्ष अर्ज भरून वाट मोकळी करून दिली होती. शेट्टी यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घ्यावा म्हणून भाजपकडून चार दिवस प्रयत्न सुरू होते. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार यांनी मनधरणी केल्यानंतर शेट्टी यांनी आपला अर्ज मागे घेतला.-दुसरीकडे अंधेरी पूर्व मतदारसंघात एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना विधानपरिषदेवर संधी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे.
दिंडोशीत काय? • दिंडोशी मतदारसंघात उद्भवसेनेचे सुनील प्रभू विद्यमान आमदार आहेत. या मतदारसंघावर त्यांची चांगली पकड़ आहे. यावेळी इथून संजय निरुपम यांना शिंदेसेनेने उमेदवारी दिली आहे; मात्र निरुपम यांचा तसा या मतदारसंघाशी संबंध नाही. बाहेरील उमेदवार म्हणून इथे प्रभू यांच्यासाठी प्रचाराची दिशा सोपी झाली आहे. त्यामुळे सध्या तरी प्रभूंसाठी ही लढाई तशी अवघड दिसत नाही,
नेत्यांचे नातेवाईक रिंगणात या भागात मालाड पश्चिम मतदारसंघातून भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार निवडणूक रिंगणात आहेत, तर जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून खासदार आणि शिंदे सेनेचे नेते रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर या नशीब आजमावत आहेत.