- मनोहर कुंभेजकर
मुंबई - विलेपार्ले विधानसभा मतदारसंघाचे २०१४ पासून भाजपाचे आमदार म्हणून अँड.पराग अळवणी नेतृत्व करतात.मात्र आता भाजप विलेपार्ल्यात नवीन चेहरा देणार का?अशी कुजबुज पार्लेकरांमध्ये सुरू झाली आहे.पार्लेकर आणि अळवणी असे गेली १० वर्षे समीकरण आहे. मात्र आता आगामी विधानसभेसाठी येथून उमेदवार म्हणून मुंबई भाजप सरचिटणीस संजय उपाध्याय यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अँड.पराग अळवणी यांना ८४,९९१ मते मिळाली होती, तर कॉंग्रेसचे जयंती सिरोया यांना २६,५६४ मते मिळाली होती,आणि अळवणी५८,४२७ मतांनी विजयी झाले होते.
संजय उपाध्याय यांनी घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी त्यांचे जनसंपर्क सेवा कार्यालय विलेपार्ले पूर्व,जिमी बिल्डिंग,पी.एम.रोड येथे उघडले आहे.यावेळी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा देखिल आयोजित केला होता.त्यांना भेटण्यासाठी भाजपाच्या अनेक नेत्यांनी आणि पार्लेकरांनी यावेळी गर्दी केली होती.तर गणपती आणि आता नवरात्री उत्सवात त्यांच्या पार्ल्यात लागलेल्या शुभेच्छा पोस्टर्सनी पार्लेकरांचे लक्ष वेधले होते.त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा पार्लेकर आणि राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.मात्र या संदर्भात भाजपाकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.