भाजप अभेद्य ठेवणार का गड? मलबार हिलमध्ये भाजप आणि उद्धवसेनेत थेट लढत

By संतोष आंधळे | Published: November 8, 2024 07:35 AM2024-11-08T07:35:25+5:302024-11-08T08:00:07+5:30

Maharashtra Assembly Election 2024: मलबार हिल येथून सहावेळा विजयी झालेले कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा पुन्हा एकदा भाजपच्या तिकिटावर येथून नशीब अजमावत आहेत. घरोघरी प्रचार हे त्यांचे सूत्र यंदाही कायम आहे, तर उद्धवसेनेने भेरूलाल चौधरींच्या रुपाने नवीन चेहरा दिला आहे.

Maharashtra Assembly Election 2024: Will BJP keep the fortress impenetrable? Direct fight between BJP and Uddhav Sena in Malabar Hill | भाजप अभेद्य ठेवणार का गड? मलबार हिलमध्ये भाजप आणि उद्धवसेनेत थेट लढत

भाजप अभेद्य ठेवणार का गड? मलबार हिलमध्ये भाजप आणि उद्धवसेनेत थेट लढत

- संतोष आंधळे
मुंबई - मलबार हिल येथून सहावेळा विजयी झालेले कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा पुन्हा एकदा भाजपच्या तिकिटावर येथून नशीब अजमावत आहेत. घरोघरी प्रचार हे त्यांचे सूत्र यंदाही कायम आहे, तर उद्धवसेनेने भेरूलाल चौधरींच्या रुपाने नवीन चेहरा दिला आहे. विशेष म्हणजे यंदा मनसेने उमेदवार न दिल्याने भाजप आणि उद्धवसेनेत थेट लढत होणार आहे. 

राज्यातील सर्वाधिक श्रीमंत मतदार असलेला भाग म्हणून मलबार हिलची ओळख आहे. येथे मराठी भाषकांसोबतच गुजराती, जैन, मारवाडी समाजातील मतदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे मलबार हिलमध्ये विजयासाठी कोणत्या एका समाजावर भिस्त ठेवून चालत नाही.  २०१४ मध्ये मनसेला चौथ्या क्रमांकाची मते येथे मिळाली होती. या मतदारसंघात महापालिकेचे पाच वॉर्ड आहेत. त्यापैकी चार वॉर्डात भाजपचा, तर उद्धवसेनेचा एक नगरसेवक निवडून आला आहे. त्यामुळे येथे भाजप विरोधातील उमेदवाराला मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. 

वाहतूक कोंडीतून मुक्तता कधी? 
 मलबार हिल परिसरात सर्व मंत्र्यांचे सरकारी बंगले, बड्या उद्योगपतींची निवासस्थाने, गगनचुंबी इमारती आहेत. वाहतूककोंडी आणि पार्किंगची समस्या येथे जटील झाली आहे. अनेक ठिकाणी अरुंद रस्त्यावर बेकायदा मार्गाने गाड्या पार्क केल्या जातात. सकाळी आणि संध्याकाळी त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होते. 

सन १९९५ मध्ये मंगल प्रभात लोढा यांनी काँग्रेसचे उमेदवार बी. एस. देसाई यांना पराभूत केले होते. त्यानंतर सलग सहावेळा ते निवडून आले आहेत. यंदा येेथे आठ उमेदवार रिंगणात आहेत. २०१९च्या निवडणुकीत नोटा पर्यायाला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. यंदा लोढा यांचा बालेकिल्ला अभेद्य राहील की, मविआचे चौधरी बाजी मारतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

लोकसभेमध्ये काय घडले ? 
लोकसभेला शिंदेसेनेविरूद्ध उद्धवसेना अशी लढत झाली. शिंदेसेनेकडून यामिनी जाधव, तर उद्धवसेनेकडून अरविंद सावंत रिंगणात होते. सावंत यांचा विजय झाला असला तरी मलबार हिलमधून यामिनी जाधव यांना ८७,८६० इतकी सर्वाधिक मते मिळाली होती. २०२४ मध्ये खा. सावंत यांना ३ लाख ९६ हजार ६५५, तर जाधव यांना ३ लाख ४२ हजार ९८२ मते मिळाली होती.  

कळीचे मुद्दे 
या भागात अरुंद रस्ते, पाणी कपात, जुन्या वसाहतीचा पुनर्विकास, बैठ्या चाळींचा विकास, झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन या समस्या प्रामुख्याने भेडसावत आहेत. 
महाविकास आघाडीच्या उमेदवाराला उद्धवसेना आणि शरद पवार गटाची कशी मदत मिळते, त्यावर गणित अवलंबून असेल. 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024: Will BJP keep the fortress impenetrable? Direct fight between BJP and Uddhav Sena in Malabar Hill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.