मुंबई - बोरिवली मतदारसंघात गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरून भाजपाची डोकेदुखी वाढवली आहे. बोरिवली विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक असलेले गोपाळ शेट्टी यांना तिकिट न देता भाजपाने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली. त्यामुळे शेट्टी नाराज आहेत. मात्र आज गोपाळ शेट्टी यांनी सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर गोपाळ शेट्टी यांनी सूचक विधान केले.
गोपाळ शेट्टी म्हणाले की, मी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना भेटलो. मी जे काही काम करतोय ते पक्ष हितासाठी करतोय. कालही करत होतो, आजही करतोय आणि उद्याही करतोय. मी पक्ष सोडणार नाही, अन्य पक्षात जाणार नाही. भाजपाचं ध्येय धोरणे इतरांपेक्षा वेगळे आहेत. पक्षात काही लोक असे आहेत जे पक्षाला नुकसान पोहचवतात त्यांच्याविरोधात माझी लढाई आहे. पक्षहितासाठी जे काही मला पाऊल उचलायचं असेल ते मी करेन. मी पक्ष सोडणार नाही आणि पक्षाचे धोरण सोडणार नाही. गोपाळ शेट्टीच्या हृदयात कमळ आहे ते कुणीच काढू शकणार नाही असं सांगत माघार घेण्याबाबत स्पष्ट बोलण्यास नकार दिला.
तर गोपाळ शेट्टी हे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी नेहमी पक्षशिस्त पाळली आहे. पक्षाचाच विचार त्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांची कितीही नाराजी असली तरी त्यांनी पक्षाचा विचार करावा. पक्षाची जी भूमिका आहे ती त्यांनी सोडू नये. गोपाळ शेट्टींची नाराजी समजू शकतो, परंतु माझा जो अनुभव त्यांच्यासोबत आहे. ते पक्षाची बाजू नेहमी राखतात. त्यामुळे ते पक्षाच्या बाजूने निर्णय करतील अशी अपेक्षा आहे असं विधान देवेंद्र फडणवीसांनी केले आहे.
दरम्यान, बोरिवली येथून भाजपाने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या बोरीवलीकरांच्या आत्मसन्मानासाठी गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी अपक्ष उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी त्यांची मनधरणी करण्यासाठी भाजपाचे संकटमोचक विनोद तावडे यांनी शुक्रवारी दुपारी ४ वाजता शेट्टी यांची पोयसर जिमखान्या समोरील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या दोघांमध्ये सुमारे दोन तास सविस्तर चर्चा झाली. मात्र आपण आपल्या निर्णयावर ठाम असून येथून अपक्ष निवडणूक लढवणार आहोत असं गोपाळ शेट्टींनी म्हटलं. त्यानंतर आज शेट्टी आणि देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली.