Join us

सदा सरवणकर प्रचाराला येताच महिलेचा राग अनावर; माहीम कोळीवाड्यात काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 4:13 PM

संतप्त महिलांनी जाब विचारला तेव्हा सरवणकरांनी कुठलीही उत्तरे न देता तिथून काढता पाय घेतला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मुंबई - राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानं जोर धरला आहे. त्यात मुंबईतील माहीम मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. या मतदारसंघातील विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना महायुतीकडून शिंदेंच्या शिवसेनेने पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर मनसेकडून अमित ठाकरे आणि उद्धव ठाकरे गटाकडून महेश सावंत हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. माहीम मतदारसंघातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यात आज प्रचार फेरीवेळी विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना माहीम कोळीवाड्यात महिलांच्या नाराजीचा सामना करावा लागला. 

माहीम कोळीवाड्यात सदा सरवणकर यांची प्रचार रॅली सुरू होती. त्यावेळी स्थानिक महिलांनी सरवकरांच्या प्रचाराला विरोध केल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. आमदारांनी स्थानिक महिलांचे फिश फूड स्टॉल हटवल्याचा आरोप महिलांनी केला. प्रचारासाठी आलेल्या सदा सरवणकरांना संतप्त महिलांनी जाब विचारला तेव्हा सरवणकरांनी कुठलीही उत्तरे न देता तिथून काढता पाय घेतला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्थानिक कोळी महिलांची नाराजी सरवणकरांचा प्रचार करणाऱ्यांना भोवली.  

माहीममधील फिश फूड स्टॉल स्थानिक आमदारांच्या सांगण्यावरून हटवण्यात आल्याचा राग या महिलांमध्ये होता. आज घरोघरी जाऊन सदा सरवणकर प्रचार करत होते, त्यावेळी एका महिलेने आमचा फूड स्टॉल का काढण्यात आला असा प्रश्न सरवणकरांना विचारला. या व्हिडिओत महिला आक्रोशाने जाब विचारताना दिसतात. त्यावेळी सदा सरवणकर महिलेची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात परंतु महिला ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. त्यानंतर आणखी काही महिला एकत्र आल्या तेव्हा सरवणकरांच्या प्रचार रॅलीला या भागातून निघून जावं लागले. 

माहीममध्ये चुरस

माहीम मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघात २००९ चा अपवाद वगळता इथं शिवसेनेचे आमदार निवडून आलेत. त्यात यंदा शिवसेनेत २ गट पडले आहेत. त्यात विद्यमान आमदार सदा सरवणकर हे एकनाथ शिंदे गटात गेलेत. त्यामुळे या मतदारसंघात महेश सावंत यांना उद्धव ठाकरे गटाने उमेदवारी दिली आहे. यावेळी माहीम मतदारसंघात मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या २ गटासोबत मनसेही निवडणुकीत उतरल्याने यंदा माहीम मतदारसंघातील चुरशीची लढत होणार आहे.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४माहीमसदा सरवणकरमुंबई विधानसभा निवडणूकउद्धव ठाकरेअमित ठाकरेमनसेराज ठाकरेएकनाथ शिंदे