Join us

"मित्र तोट्यात जाऊ नये म्हणून नाणार प्रकल्पाला विरोध केला"; राज ठाकरेंचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 9:29 PM

वरळीतल्या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पावरुन उद्धव ठाकरेंवर आरोप केले आहेत

Worli Assembly Constituency : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वरळीतल्या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पावरुन उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्योगपतींच्या सांगण्यावरुन उद्धव ठाकरे यांनी कोकणातल्या प्रकल्पांना विरोध केला असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पावरूनही राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष केलं आहे. 

वरळीत मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांनी दुसरी सभा घेतली आहे. वरळीत संदीप देशपांडे यांची लढत ठाकरे गटाचे विद्यमान आमदार आदित्य ठाकरे आणि शिंदे गटाचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्याशी लढत होणार आहे. त्यामुळे या हायप्रोफाईल लढतीकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. वरळीतल्या जांभोरी मैदानातल्या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पावरुन उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

"कोकणामध्ये येणाऱ्या अणुऊर्जा प्रकल्पाला उद्धव ठाकरेंनी विरोध केला होता. मग त्या अणुऊर्जा प्रकल्पाचे काम थंड पडले. आपल्या कोकणामध्ये हा अणुऊर्जा प्रकल्प आला आणि तिथे भूकंप होऊन स्तुनामी आली आणि त्या अणुऊर्जा प्रकल्पात पाणी शिरलं तर हाहाकार होईल असं कारण त्यांनी दिलं होतं. अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना कल्पना नाही का मुंबईत १९६० साली बाबा ऑटोमिक सेंटर उभे करण्यात आले आहे. त्यामध्ये न्यूक्लिअर रिऍक्टर आहेत, आपल्या शहराच्या मध्यभागी अणुऊर्जा प्रकल्प आहे तर कोकणातला अणुऊर्जा प्रकल्प रद्द का करायला लावला," असा सवाल राज ठाकरेंनी केला.

"कोणत्या उद्योगपतीने या अणुऊर्जा प्रकल्पाचा विरोध करायला सांगितला होता. विरोध करतात तेव्हा कोणीतरी उद्योगपती यामागे असतोच त्याशिवाय विरोध करत नाही. नाणारला सुद्धा ऑइल रिफायनरी येणार होती. आता विचार करा की या ऑइल रिफायनरीला उद्धव ठाकरेंनी विरोध कशासाठी केला. त्यांच्या परिचयाचे अशी कोण लोक आहेत ज्यांची ऑइल रिफायनरी आहे ज्यांच्या ते लग्नाला जातात. अजून एक ऑइल रिफायनरी आली तर आपला मित्र तोट्यात जाईल आणि तो तोट्यात जाऊ नये म्हणून कोकणात येणाऱ्या ऑइल रिफायनरीला विरोध झाला. हे असे विरोध सहज होत नसतात. यामागे खूप मोठे राजकारण असतं. नुसते साधे राजकारण नसते तर त्याच्यामागे सगळे आर्थिक राजकारण असतं," असेही राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पावरूनही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. धारावीच्या विकासाला उद्धव ठाकरे विरोध करत आहेत याच्यामागे देखील आर्थिक राजकारणच आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलं.

दरम्यान, शरद पवार हे आयुष्यभर भूमिका बदलत गेले, त्यांच्या बाबतीत बोलायलाच नको भूमिका पण लाजते, असेही राज ठाकरे म्हणाले. मी माझ्या स्वार्थासाठी भूमिका बदलल्या नाहीत. या देशामधला पहिला माणूस मी होतो की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावे अशी भूमिका घेतली. मला ज्या गोष्टी हव्या होत्या, त्याच्याविरुद्ध गोष्टी चालू केल्या. २०१९ मध्ये अनेक गोष्टी चांगल्या झाल्या, त्यामध्ये कलम 370 हटविणे असेल किंवा राम मंदिराची उभारणी असेल, त्यामुळे आपण त्यांना पाठिंबा दिला, असेही राज ठाकरेंनी म्हटलं.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४मुंबई विधानसभा निवडणूकवरळीराज ठाकरेउद्धव ठाकरे