Worli Assembly Constituency :वरळी विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होणार आहे. वरळीतआदित्य ठाकरे यांच्यासमोर मनसेच्या संदीप देशपांडे आणि शिवसेना शिंदे गटाच्या मिलिंद देवरा यांचे आव्हान असणार आहे. आदित्य ठाकरेंना पराभूत करण्यासाठी शिंदे गट आणि मनसेकडून जोरदार तयारी केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांनी या मतदारसंघात मोठी ताकद लावली आहे. मात्र अशातच शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी १३ दिवसांवर निवडणूक आली असताना ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
वरळीत ऐन निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. वरळीतील शिंदे गटाच्या शाखाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला आहे. तीन शाखाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांनी निवडणूक काळात साथ सोडल्याने वरळीत शिंदे गटाला मोठा हादरा बसला आहे. मातोश्री येथे पक्षप्रवेशानंतर आदित्य ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांचे स्वागत करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
"अनेक लोक दोन वर्षांपूर्वी सरकारमध्ये काही चांगलं होऊ शकतं म्हणून तिकडे गेले होते. यातल्या अनेक लोकांच्या संपर्कात मी होतो. त्यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी एकच सांगितलं की वरळीसाठी आणि महाराष्ट्रासाठी जे करायचं होतं ते त्यांनी केलं नाही. मुंबईची जी लूट होतीय, कोळीवाड्यात क्लस्टर डेव्हलपमेंटच्या नावाखाली कोळी बांधवांना त्यांच्या घरातून काढून दोन इमारतीमध्ये कोंबून सगळी जमीन बिल्डरांना देऊ इच्छित आहेत. हे पाप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप करत आहे. ते कुठल्याही मुंबईकराला आणि महाराष्ट्रातल्या जनतेला मान्य असू शकत नाही. पक्ष प्रवेश होतोय तेव्हा त्यांना हेच सांगितलं आहे की येणार सरकार आपलेच आहे. महाराष्ट्राची जी आर्थिक घडी बिघडवलेली आहे ती पुन्हा नीट बसवण्यासाठी आज हे सहकारी सोबत आलेले आहेत," असं आदित्य ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रावर प्रेम असणारी लोक पुन्हा एकदा आपल्या पक्षात आली आहेत त्यामुळे मी त्यांना पश्चाताप होऊ देणार नाही, असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
ठाकरे गटाची मिलिंद देवरांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
शिवसेना ठाकरे पक्षाने मिलिंद देवरा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. या तक्रारीची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. अधिकाऱ्यांना तक्रारीवर २४ तासांच्या आता कार्यवाही अहवाल सादर करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे. मिलिंद देवरा यांनी प्रचारासाठी शोभायात्रा काढण्यात आली होती. यासाठी पाचशे रुपये देऊन यात्रेत सहभागी झाल्याचे काही लोकांनी कबुली दिली. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाकडे आचार संहितेचा भंग केल्याची तक्रार केली.