"यांच्या स्वभावातच कोणाशी..."; वांद्रे पूर्वमध्ये उमेदवार देताच ठाकरेंवर झिशान सिद्दीकींची खोचक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 11:55 AM2024-10-24T11:55:28+5:302024-10-24T12:09:09+5:30
Maharashtra Assembly Election 2024: वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून वरुण सरदेसाईंना उमेदवारी दिल्यानंतर झिशान सिद्दीकींनी टीका केली आहे.
Zeeshan Siddique on Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राज्यातील ६४ विधानसभा जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. बुधवारी ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीत उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नावाचाही समावेश आहे. वरळी मतदारसंघातून ते पुन्हा रिंगणात आहेत. दुसरीकडे वांद्रे मतदारसंघातून ठाकरे गटाने वरुण सरदेसाई यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. वरुण सरदेसाई यांच्यासमोर विद्यमान आमदार झिशान सिद्दीकी यांचे आव्हान असणार आहे. सरदेसाईच्या उमेदवारीची घोषणा होताच झिशान सिद्दीकी यांनी सोशल मिडिया पोस्टच्या माध्यमातून टोला लगावला आहे.
वांद्रे पूर्व मतदारसंघातून बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी वरुण सरदेसाई यांना तिकीट दिले आहे. वरुण सरदेसाई पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. झिशान सिद्दीकी यांनी काँग्रेसच्या तिकिटावर या जागेवरून निवडणूक जिंकली होती. मात्र आता ते अजित पवार गटात सामील झाले आहेत. १२ ऑक्टोबर रोजी बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे दिसत आहेत. उमेदावारी जाहीर झाल्यानंतर झिशान सिद्दीकी यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
झिशान सिद्दीकी यांनी आपल्या पोस्टमध्ये, 'वांद्रे पूर्वमध्ये जुन्या मित्रांनी त्यांचा उमेदवार घोषित केल्याचे ऐकले आहे. सोबत राहणे त्यांच्या स्वभावातच नव्हते, असे म्हटलं आहे. तसेच तुमचा आदर आणि सन्मान करणाऱ्यांशीच संबंध ठेवा. आपापल्या फायद्यांसाठी जमलेल्या गर्दीचा काहीच फायदा नसतो. आता जनता निर्णय घेईल, असेही झिशान सिद्दीकी म्हणाले.
सुना है पुराने दोस्तों ने वांद्रे पुर्व में अपना उम्मीदवार घोषित कर दिया है । साथ निभाना तो कभी इनकी फितरत में था ही नहीं।
— Zeeshan Siddique (@zeeshan_iyc) October 23, 2024
“रिश्ता उसी से रखो जो इज़्ज़त और सम्मान दे,
मतलब की भीड़ बढ़ाने का कोई फ़ायदा नहीं।”
अब फैसला जनता लेगी!!!!
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने आतापर्यंत ३८ उमेदवार उभे केले आहेत. मात्र, त्यांनी अद्याप वांद्रे पूर्व जागेसाठी उमेदवार दिलेला नाही. झिशान सिद्दीकी यांनी वांद्रे पूर्व मतदारसंघातूनच निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. अशा स्थितीत आता राष्ट्रवादीच्या यादीत झिशान यांचे नावही नसल्याने वांद्रे पूर्व जागेबाबत पेच निर्माण झाल्याचे दिसत आहे. शिवसेना (शिंदे) आणि भाजप हे दोन्ही पक्ष या जागेवर दावा करत आहेत. शिंदे गटाच्यावतीने ही जागा त्यांची परंपरागत जागा असल्याचे म्हटलं आहे. या जागेवर उमेदवारी देण्याची भाजपचीही इच्छा आहे. त्यामुळेच अजित पवार यांनी या जागेवर उमेदवार जाहीर केला नसल्याचे मानले जात आहे.